लक्ष्मण जगताप, बारामती
आजची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अल्पवयीन मुले व महाविद्यालयीन तरुण हिंसक बनत आहेत. यात दोष कुणाचा ? यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.आजची ही मुले मनात कोणतीही भीती न बाळगता सहजच हातात कोयता, तलवारी घेऊन भांडणे, मारामा-या करतात. मागचा पुढचा विचार न करता खून करण्यापर्यंत मजल मारतात. हे सगळं भीषण आणि भयावह आहे.
ज्या वयात चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे असते. कुटुंबाची जबाबदारी घेऊन आई वडीलांना आनंद द्यायचा असतो. अशा वयात मुले भरकटली जातात. चुकीचा रस्ता निवडतात. थोड्याशा कारणावरुन डोक्यात राग घालून घेतात.आणि रागाच्या किंवा सूडाच्या भरात हिंसक मार्गाचा अवलंब करुन एखाद्याचा जीव घेतात. बरं जीव घेऊन साध्य काय होते? काहीच नाही. उलट आयुष्याची माती होते. मुलांच्या हे अगोदर लक्षात येत नाही. आपल्या हातून घटना घडून गेल्यावर कळते.आपण काय केले ते ? तोपर्यंत वेळ गेलेली असते. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी राग असतो.
तरुण मुले सळसळत्या रक्ताची असतात. या वयात त्यांना प्रचंड राग येतो. कुणी बोलले, कुणी रागवले, कुणी भांडले किंवा आपल्या मनाविरुद्ध कोणी वागले तर त्यांना सहन होत नाही. मनात राग साठवून ठेवतात. एखाद्या दिवशी तो राग उफाळून येतो आणि एखाद्याचा जीव घेण्याची घटना घडून जाते.
खरं तर राग हा एक अग्नीच आहे. त्यापासून आपण दूर राहणेच फायदेशीर असते. तरुण मुलांनी संयम आणि सहनशीलता ठेवणे खूप आवश्यक आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपणास अनेक व्यक्ती भेटतात. काही वेळा वादविवादाचे, भांडणाचे प्रसंग घडतात.अशा वेळी संयमाने परिस्थिती हाताळली पाहिजे. किरकोळ भांडणातून एखाद्याचा जीव घेण्यापर्यत जाणे हे अतिशय क्रुरतेचे लक्षण आहे. कोणत्याही वादावर किंवा भांडणावर संवाद हा खूप चांगला उपाय आहे. एकमेकांशी बोलून, चर्चा करुन वादविवादाचे विषय मिटविता येतात.
निकोप आणि आनंदी जगण्यासाठी सकाळी झालेले भांडण सूर्यास्ताअगोदर मिटवून टाकणे नेहमी चांगले असते.त्यामुळे ताणमुक्त जगता येते.मन स्थिर राहते. मालिका, चित्रपट यामध्ये दाखविले जाणारे खून, मारामारी, बलात्कार पाहूनही आपणही असे करुन बघावे असा विचार मुलांच्या मनात येतो. मग त्याविषयी मनातून नियोजन केले जाते. अशी कृत्ये करणे वाईट आहे.यात धोके असतात. याची जाणीव मुलांना होत नाही.
चित्रपटातील नायकाला आदर्श मानण्यात मुलांना आनंद वाटतो. नायकाप्रमाणे आपणही खून ,मारामारी करायला मुलांचे मन उद्युक्त होते. परंतु मालिका, चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात याचा विसर पडतो. अनुकरण करण्याकडे मुलांचा कल जातो.आणि नको त्या घटना मुलांच्या हातून घडून जातात.
मुले कोणते कार्यक्रम पाहतात? किती वेळ पाहतात ? टिव्ही, मोबाईल व यु-ट्युबवर काय पाहतात? मुलांचे मित्र कसे आहेत? त्याच्या वर्तनात काही बदल जाणवतो का? याविषयी पालकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. वाईट गोष्टीचे अनुकरण करण्यास मुले आघाडीवर असतात, म्हणून या वयात मुलांवर खूप लक्ष असणे आवश्यक आहे.
पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे.रागाच्या वेळी
भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे? रागाला आवर कसा घालावा? मनाविरुद्ध काही घडले तरी संयम कसा ठेवावा? सहनशीलता कशी वाढवावी? अपमान कसा विसरावा. या सगळ्या गोष्टी मुलांना समजावून सांगितल्या पाहिजेत. किशोरवयीन मुलांच्या व महाविद्यालयीन तरुणांच्या शरीरात हार्मोन्समुळे अनेक बदल घडून येतात. या वयात मुले रागीट व चिडखोर बनतात.मोठ्या माणसांनी सांगितलेले ऐकण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो.
अशा वेळी मुलांशी बोलून त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. रागावर मात कशी करावी ,मन शांत कसे ठेवावे यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम , यांचा चांगला उपयोग होतो. माणसाच्या हातून घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीच्या मुळाशी राग किंवा अविचार असतो. राग येणे ही स्वाभाविक आणि नैसर्गिक गोष्ट आहे.पण त्यावर नियंत्रण मिळविणे खूप महत्त्वाचे आहे.ज्याच्या कडे रागावर नियंत्रण मिळविण्याचे कौशल्य आहे तो आनंदी जगू शकतो आणि दिर्घायुषी होऊ शकतो.











