बारामती : महान्यूज लाईव्ह
भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारल्यास इंदापूर तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेतील अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे त्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र आल्याने या चर्चेत भर पडली होती.
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आले आणि हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात खरीच बंद दाराआड चर्चा झाली का? यावर अनेक मतमतांतरे व्यक्त होत होती. त्यातच आज दुपारी बारामतीत पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला आणि सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा थेट उत्तर न देता हर्षवर्धन पाटील आणि त्यांची राजकीय संबंध याविषयीच वक्तव्य केले.
सुप्रिया सुळे यांना या विषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये कोणत्याच पक्षाने कधीही, कसल्याही प्रकारची राजकारण केले नाही. अनेक वर्ष शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सर्वांनाच बरोबर घेऊन काम केले आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्ष हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार एकत्र काम करत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. अर्थात आमचे कौटुंबिक संबंध अतिशय चांगले आहेत. हर्षवर्धन पाटील हे सहकारातील जाणकार नेते आहेत, देशातील साखर कारखान्याच्या संघटनेचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे या संदर्भात हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली असावी असे मत त्यांनी व्यक्त केले.











