काका यादव, भवानीनगर
सलग तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे सणसर (ता. इंदापूर) येथील खटकेवस्ती ते रायतेमळा या रस्त्यावरील पूल पावसाच्याा पाण्यात वाहून गेला.
सणसर येथील रायतेमळा या रस्त्यावरील ओढ्यावरील पुल पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने पुलाखालील सिमेंटच्या पाईप पूर्णपणे उघड्या पडल्या आहेत. या ओढ्याला निंबोडी, काझड, शिंदेवाडी आदी परिसरातून पावसाचे पाणी येते. मागील तीन ते चार दिवसांमध्ये सणसर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
त्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले व या पाण्याच्या दाबाने खटकेवस्ती येथील ओढ्यावरील पुल वाहून गेला. रायतेमळा येथून सणसरकडे येण्यासाठी हा जवळचा मार्ग असून खटकेवस्ती येथे दोन ओढ्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी हा पुल असून पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांची येण्या जाण्याची अडचण निर्माण झाली आहे.
सणसर येथील अनेक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी या पुलावरून जावे लागते. या पुलावरून काझड शिंदेवाडी निंबोडी आदी परिसरातून ग्रामस्थ सणसरकडे ये जा करतात, परंतु पूल वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे अवघड झाले आहे. या ठिकाणी शासनाने त्वरित पुलाचे नियोजन करून द्यावे अशी मागणी होत आहे.











