मुंबई – महान्यूज लाईव्ह
जागतिक बाजारात सोन्याच्या दराला झळाळी मिळाली असून सोन्याचे दर ५८ हजारांवरून आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल ६४ हजारांवर पोचले आहेत. दरम्यान शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही नजर सोन्यावर पडली असून जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार सन २०२४ मध्येच सोने ७५ हजार रुपये तोळ्यावर पोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईत सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्रॅम ६४ हजारांवर पोचले होते. अमेरिकेतील बॅंक ऑफ अमेरिका सिक्युरीटीने एक अहवाल नुकताच प्रकाशित केला असून त्यामध्ये सोन्याचा दर हा वर्षाअखेरीपर्यंत ७५ हजार रुपये प्रतितोळा पोहोचू शकतो असा अंदाज वर्तविला आहे.
जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे हा भाव ७५ हजारांपर्यंत पोचण्याची शक्यता असल्याने सोन्यातील गुंतवणूक प्रभावी ठरू शकते असा अंदाज सोन्याच्या बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे चांदीचेही दर वाढले असून प्रतिकिलो ७२ हजारांवर चांदीचे दर पोचले आहेत.











