१३ व १४ फेब्रुवारीला होणार अधिवेशन
बारामती : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५६ वे वार्षिक अधिवेशन गुरुवार दि. १३ व शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिली. या अधिवेशनाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते आणि संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार छत्रपती संभाजीराजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष वसंत पाटील हे असणार आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य शासनाकडे विलीनीकरण करावे, शासनाकडील शिल्लक रक्कम संघटनेने दिलेल्या सूत्राप्रमाणे वाटप करावी, ३१ डिसेंबर २०१९ रोजीच्या परिपत्रकातील शिस्त व आवेदन प्रणाली रद्द करावी, यापूर्वीच्या सरकारने काढलेली विविध परिपत्रके रद्द करावीत, एसटी महामंडळाचे कंत्राटीकरण रद्द करावे, भाडे तत्त्वावरील शिवशाही बसेस बंद कराव्यात, एसटी कर्मचाऱ्यांना गणवेश कापड व शिलाई भत्ता सुरु करावा, चालक तथा वाहक संकल्पना रद्द करावी अशा विविध मागण्यांबाबत या अधिवेशनात उहापोह करून घेतले जाणार आहेत.











