बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या असून, आज राज्यातील 44 पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षकांचाही समावेश आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोलीच्या पोलीस उप महानिरीक्षक पदी बदली झाली असून, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे.
बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती झाली असून, त्यांच्या जागी संजय जाधव यांची नियुक्ती झाली आहे. यापुढील काळात बारामतीचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक हे संजय जाधव असतील. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब हे संजय जाधव यांचे गाव असून त्यांनी यापूर्वी चंद्रपूर, कोल्हापूर, तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
बारामतीतच पूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक असलेले सध्याचे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती झाली असून, पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांची बृहन्मुंबईच्या पोलीस उपायुक्त पदी बदली झाली आहे. आज गृह विभागाने मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची होमगार्डच्या महासमादेशक पदी पदोन्नतीने बदली झाली असून, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदी बदली झाली आहे.
बारामतीच्या विभागात आनंद भोईटे यांनी अल्पकाळातच चांगला ठसा उमटवला..!
या बदल्यामध्ये बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांची देखील बदली झाली असून, ते आता बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त असतील. त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्यांची बदली झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते स्वतःच्याच जिल्ह्यात असल्याने ही बदली निवडणुकीच्या कामकाजाच्या दृष्टीने झाली आहे. अर्थात आनंद भोईटे यांनी अल्पकाळातच त्यांच्या वेगळ्या शैलीने लोकांना न्याय दिला.
उत्कृष्ट पोलीसिंग हा त्यांच्या कामकाजाच्या शैलीचा भाग होता. विद्यार्थ्यांपासून तक्रारदारापर्यंत प्रत्येकाचे ऐकून घेऊन अन्याय दूर करण्याबरोबरच, पोलिसांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आनंद भोईटे यांनी लॉजिंग तसेच कॅफे यांच्या बाबतीत उचललेल्या पावलामुळे पालकांमध्ये भोईटे यांची प्रतिमा चांगलीच उंचावली होती. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेविषयी जनजागृती करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठे गुन्हे अल्पकाळातच उघडकीस आले.











