विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे.लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आपलं लग्न आता थाटामाटात व्हावं अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. लग्न सोहळ्यामध्ये सध्या हटके ट्रेड पाहायला मिळतात. भारतीय लग्नांमध्ये मोठा खर्च देखील केला जातो. आई-वडील देखील मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. बारामती तालुक्यातील पणदरे येथील उद्योजक सतीश मानसिंग कोकरे यांनी त्यांच्या मुलीची वरात चक्क हेलिकॉप्टरमधून काढली.
त्याच झालं असं की, पणदरे येथील सतीश मानसिंग कोकरे यांची कन्या प्रतीक्षा हिचा शुभविवाह लक्ष्मण काशीराम मदने यांचे चिरंजीव रुपेश याच्यासोबत काल ओम साई लॉन्स, पाहुणेवाडी येथे पार पडला. त्यावेळी पणदरे येथील सतीश कोकरे यांनी आपल्या मुलीच्या विवाहनिमिताने हेलिकॉप्टर सफरीचे आयोजन केले होते. विवाह सोहळा आगळा वेगळा व्हावा म्हणून वधू वराला हेलिकॉप्टर मधून सफर घडविली. पणदरे ते पाहुणेवाडी येथील ओम साई लॉन्स अशी त्यांनी हेलिकॉप्टर ची सफर घडवली.
लग्न मंडपात वधू वर थेट हेलिकॉप्टर मधून दाखल झाले.हेलिकॉप्टर मधून निघालेली ही वधूवराची वरात पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सतीश कोकरे यांना एकुलती एक मुलगी असल्याने तिचा विवाहसोहळा थाटामाटात व्हावा व त्यांनी विवाहसोहळ्यात काहीतरी खास करायचं ठरवलं होतं. लग्नात सरप्राइज म्हणून त्यांनी मुलीची वरात पणदरे ते पाहुणेवाडी अशी काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.











