दौलतराव पिसाळ, वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु न झाल्याच्या निषेधार्थ शिरवळ ग्रामपंचायतीसमोर भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांच्यासह ७ युवकांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरवळ पोलिसांनी तत्परता दाखवत आंदोलकांना ताब्यात घेतले.
याबाबतची घटनास्थळी भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ (ता.खंडाळा) या ठिकाणी शासनाच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 4 कोटी 72 लाख 83 हजार 667 रुपये किंमतीची जलशुध्दीकरण पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. दरम्यान, शिरवळ गावच्या पाणीपुरवठा योजनेबाबत शासनाच्या नियमावलीनुसार नवीन योजनेमध्ये 20 दशलक्ष लिटर क्षमतेची जलशुद्धीकरण केंद्रासाठी 10 गुंठे व 1.80 लाख लिटर क्षमतेच्या उंच टाकीसाठी 2 गुंठे जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत शिरवळच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पाणी टाकीजवळ शिरवळ ग्रामपंचायतीने जागा सूचित केली होती, मात्र खंडाळा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी पाहणीनंतर सदरची जागा ही शासकीय नियमावलीनुसार शिरवळसाठी अपुरी असल्याचे जागेची मोजमापे घेण्यात आल्यानंतर निदर्शनास आले.
त्यानुसार उपअभियंत्यांनी व कार्यकारी अभियंत्यांनी सातारा जिल्हा परिषदेचा अहवाल येताच संबंधितांशी लेखी व तोंडी झालेल्या बैठकीमधील निर्णयानुसार व पाहणीनुसार शिरवळ येथील शासकीय गट नंबर 944 मधील जागा निश्चित करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिपूजन करण्यात आले.
त्यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीजवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी जनता फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी यांच्यासह युवकांनी केली व खंडाळा पंचायत समितीसमोर घंटानाद करीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु न झाल्यास गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.
आज गुरुवार (दि.१२ ऑक्टोबर रोजी) शिरवळ ग्रामपंचायतीसमोर शिरवळ पोलीसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, जनता फाऊंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य कांबळे, इम्रान काझी, हितेश जाधव, गणेश पानसरे, गजानन कुडाळकर, केदार हाडके यांनी शिरवळ ग्रामपंचायतीसमोर येत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
शिरवळ पोलिसांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेनंतर शिरवळ पोलीस ठाण्यात आमदार जयकुमार गोरे यांनी भेट देत शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी आमदार जयकुमार गोरे पत्रकारांना म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असताना कार्यकर्त्यांना आंदोलनाची वेळ यायला नको होती. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याबरोबर चर्चा करून शिरवळ जलजीवन पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल.











