दौंड तालुक्यातील या गावातील घटना!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील बोरीभडक फाटा येथे टाटा सफारीची दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ बहिणीला जोरदार धडक देऊन अपघाताची भीषण घटना घडली. या अपघातात बहिण गंभीर जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला! रक्षबंधन दिवशीच भाऊ आणि बहिणीच्या दुचाकीला अपघात झाल्याने राखी बांधायच्या आताच बहिणीचा मृत्यू झाल्याने बोरीभडक गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे .
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, फुरसुंगी येथील नामांकित कंपनीची मालक असलेल्या अभियंता वैशाली निलेश शेंडगे या रक्षाबंधनासाठी भाऊ विलास विश्वनाथ कोपनर यांच्या दुचाकीवरुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात होत्या. बोरीभडक फाट्यावर पुणे कडून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा सफारीने दुचाकीला जोरदार धडक दिली.
बुधवारी (दि ३०) सायंकाळी ७ वाजण्याच्या आसपास बोरीभडक फाट्यावर ही अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये हे दोघे भाऊ बहिण रस्त्यावर पडलेल्या दोघांना मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच वैशालीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर भाऊ विलास हा जखमी झाल्याने उपचार घेत आहे.
दरम्यान, विलास कोपनर हे उरुळी कांचन येथील बसस्थानकावर रक्षाबंधन सणानिमित्त राखी बांधायला बहिण वैशाली हिला घेऊन तो दुचाकीवरुन घरी जात असताना फक्त पाच किलोमीटर अंतरावर गाव आले असतानाच काळाने घाला घातला आणि राखी बांधायच्या आताच बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातील टाटा सफारी ही गाडी खोर येथील नामांकित व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर येत असून यवत पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावर बोरीभडक फाट्याजवळ लावलेले विद्युत पथदिवे बंद पडलेले आहेत, तर रस्त्यावर चार महिन्यांपासुन पडलेला मोठा खड्डा जिवघेणा ठरत आहे. तो लवकर बुजवावा, याठिकाणी अपघात होणार नाही यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.











