बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाग्रस्तांच्या मदतीला गेल्या पाच महिन्यांपासून तत्परतेने धावून जाणाऱ्या डॉक्टरांनाच समाजकंटकांनी लक्ष्य केल्याने बारामतीत संतापाची भावना असून जे दवाखाने कोरोनाच्या काळात रुग्णांवर उपचार करीत आहेत, तेच दवाखाने लक्ष्य होत असतील तर काय करायचे ही भावना डॉक्टरांमध्ये आहे.
१० सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बारामतीतील आरोग्य हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या प्रकाराचे आज बारामतीत पडसाद उमटले. डॉ. सुजित अडसूळ यांना मारहाणीच्या वृत्ताने सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली.
कोरोनाचा बारामतीत पहिला रुग्ण आढळला, तेव्हाच डॉ. सुजीत अडसूळ यांनी तत्परतेने पुढाकार घेत उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मदतीने कोरोनाची हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनच्या माध्यमातून डॉ. अडसूळ यांनी बारामती, इंदापूर, फलटण, सातारा, कर्जत, सोलापूर आदी भागातील रुग्णांना तातडीने पुणे, मुंबई आदी ठिकाणच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील बेड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. औषधांसाठीही त्यांनी पाठपुरावा केला. वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी कोरोना जनजागृतीसाठी केल्या. त्यांच्यावरच हल्ला झाल्याने डॉक्टरही हतबल झाले आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे सध्या खासगी दवाखाने अधिक बिले आकारतात या मुद्द्यावरून रडारवर आहेत. मात्र बारामतीत डॉ. राहूल जाधव यांनी सरकारी आदेश मिळताच दवाखाना कोविड करून तेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले. आजपर्यंत त्यांच्या दवाखान्यातून ९७ गंभीर अवस्थेत पोचलेले रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्या दवाखान्यात हा हल्ला झाल्याने पुढे काय होणार हा प्रश्न वैद्यकीय व्यावसायिकांना पडला आहे.
दरम्यान आज संध्याकाळी यासंदर्भात मेडीकोज गिल्ड या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेची बारामतीत बैठक झाली. या बैठकीत रात्री घडलेल्या घटनेवर चर्चा झाली. यामध्ये पुढे काय भूमिका घ्यायची यासंदर्भात चर्चा झाली. चर्चेचे तपशील समोर आले नाहीत, मात्र संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या बोटचेपे धोरणावरही वादळी चर्चा झाल्याचे समजते.










