इंदापूर: महान्यूज लाईव्ह
११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान इंदापूर तालुका लॉकडाऊन करण्यात येणार आहे. शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी नगराध्यक्षांनी केली होती, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही इशारा दिला होता. मात्र गणेशोत्सवाच्या सुरवातीपासून तालुक्यातील बरीच गावे उत्स्फूर्तपणे बंद आहेत, शिवाय जिथे जिथे कोरोनाचे रुग्ण अधिक आढळले, तेथेही गावांनी बंद पाळला, आता त्यांना पुन्हा इंदापूर शहरासाठी १० दिवसांचा बंद पाळावा लागणार आहे. त्यामुळे मात्र नाराजी आहे. गाडीबरोबर नळ्याची वरात असा काहीसा प्रकार आमच्या वाट्याला आल्याचे गावातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, नगराध्यक्षा अंकिता शहा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. शहरासह तालुक्यात कडकडीत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. दुध व औषधी सेवा वितरणास परवानगी दिली असून इतर व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. या जनता कर्फ्यूची नियमावली बारामती शहराप्रमाणेच असेल, त्याची घोषणा प्रांताधिकारी कांबळे करणार आहेत.
कोरोनाचा इंदापूर तालुक्यात सामूहिक प्रसार बारामती प्रमाणेच वाढू लागला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या दौऱ्यापासून गावांनी बंद पाळला आहे. ही बहुतेक गावे बारामतीच्या संपर्कात असतात. दैनंदिन व्यवहारासाठी येथील लोकांना बारामतीला जावे लागते, आता बारामती देखील ७ दिवसांसाठी बंद करण्यात आल्यानंतर त्याचा परिणाम याही गावांवर झाला.
भवानीनगर, सणसरसह काही गावांची बाजारपेठ सोमवारपासून उघडी करायची होती, मात्र वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार यांनी ग्रामस्थ, व्यावसायिकांची एकत्रित बैठक घेतली, तेव्हा बारामतीत बंद पाळला आहे, कोरोनाचे रुग्णसंख्या वाढू नये यासाठी आम्ही देखील आणखी पाच दिवस उत्स्फूर्तपणे बंद पाळू असे सांगितले आणि येथील बाजारपेठा बंद राहील्या. या गावांमध्ये जे कोरोनाग्रस्त आढळल्याने गावे बंद राहीली, ते कोरोनाग्रस्त कोरोनावर मात करून घरी परतले, मात्र गावे बंदच राहीली, ती उघडायची, त्याच दिवशी पुन्हा संपर्कातले कोरोना रुग्ण आढळतात. परिणामी पुन्हा गावांवर बंदीची वेळ येते.
इंदापूर शहरात आतापर्यंत जनता कर्फ्य़ू घेतलेला नव्हता, किंबहूना गावे जेवढ्या काळ बंद राहीली, त्यापेक्षा कमी काळ शहर बंद राहीले. त्यामुळे शहरात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र लिहून जनता कर्फ्यूची मागणी केली होती. त्याअगोदर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी नागरिकांना आवाहन करून स्वयंशिस्त पाळली नाही, तर बंदचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा दिला होता. आता नगराध्यक्षांची मागणी शहरापुरती होती, मात्र ती संपूर्ण तालुक्याच्या वाट्याला आली असल्याचे ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
काही व्यावसायिकांनी सांगितले की, भाड्याने दुकान गाळे आहेत. वर्षात ८० दिवस दुकान सुरू राहील, कामगारांच्या पगाराचीही मारामार होणार आहे, आम्हालाही कोरोनाला रोखायचे आहे, मात्र त्यासाठी सातत्याने बंद पाळून उपयोग होणार नाही. यातून बंद पाळायचा म्हणजे फक्त व्यापाऱ्यांवरच सारे काही येते, हे सर्वथा चुकीचे आहे. काही गावांत गणेशोत्सवाच्या दिवसापासून बंद पाळला गेला आहे. आजही ही गावे बंदच आहेत. तरी देखील कोरोनाचे रुग्ण येत आहेत.
कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण आणायचे असेल, तर सिरो सर्व्हे किंवा प्रत्येक गावांत घरटी सर्वेक्षण करून रॅपीड अॅंटिजेन चाचण्या केल्या पाहिजेत, तेवढी तत्परता मात्र कोणी दाखवत नाही. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रॅपीड किट देऊन गावागावातील बाहेर फिरणाऱ्या घरटी एका व्यक्तीची तपासणी झाली, तर कोरोनावर खऱ्या अर्थाने नियंत्रण येऊ शकेल, मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून बंदकडे मात्र लगेच बोट जाते अशा शब्दांत काही व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.










