बारामती : महान्यूज लाईव्ह
कोरोनाने शेती व शेतकऱ्यांना उध्वस्त केले असले तरी पुणे जिल्ह्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग मात्र दौंडपासून बारामती मार्गे इंदापूर तालुक्यातील रस्त्याकडेच्या शेतकरी, निवासी नागरिकांसाठी कोरोनाच्या काळात मदतीला पावला असून सध्या सुरू असलेला भूसंपादनातील घोळ लवकर संपला तर शेतकऱ्यांना ७५० कोटींहून अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे.
शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तीनही तालुक्यातील काही गावांमधील रस्ता भूसंपादनाचे निवाडे पूर्ण झालेले आहेत. त्यापैकी काही गावांतील शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या फाईल्स व आवश्यक कागदपत्रे प्रांताधिकारी कार्यालयातील भूसंपादन कक्षाकडे सोपवली आहेत. या तीन तालुक्यातील १५० हेक्टर जमीन या रस्त्यासाठी भूसंपादन होणार आहे. त्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. मात्र काही ठिकाणी भूसंपादनात त्रुटी राहीलेल्या आहेत. काही ठिकाणी शेजारच्या जमीनींना दिलेली किंमत शेजारच्या जमीनींना मिळालेली नाही. ते शेतकरी हेलपाटे मारत आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार का न्याय?
दौंडचे आमदार राहूल कुल यांनीदेखील त्यांना भेटलेल्या शेतकऱ्यांना घेऊन मध्यंतरी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांचीही भेट घेतली होती. अनेक शेतकऱ्यांच्या संपादनात घोळ असून हा घोळ मिटवावा अशी मागणी त्यांनी केली होती. दौंड तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, हा घोळ संपला तर या शेतकऱ्यांची संपादन भरपाई आणखी वाढू शकते. इंदापूर तालुक्यातही सणसर, भवानीनगर, निमगावकेतकी येथील नियोजित रस्ता वादग्रस्त असल्यावरून शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, तेथील शेतकऱ्यांचा प्रश्न अजून मिटलेला नाही, तर लासुर्णे – जंक्शन येथील शेतकऱ्यांनी या संपादनातील त्रुटी समोर घेऊन वकीलांशीही चर्चा सुरू केली आहे. वेळ पडल्यास न्यायालयीन प्रक्रियाही राबविण्याची तयारी सुरू आहे.










