शिवजयंती १९ फेब्रूवारीलाच साजरी करा; अमोल मिटकरी यांचं आवाहन..
बारामती : महान्यूज लाईव्ह
महापुरुषांचं कार्य पुढे न्यायचं असेल तर जुन्या विचारांचा आधार नसला पाहिजे.. पंचांग बनवणारांनी खोडसाळपणे शिवजयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार असं नमूद केलंय.. त्यामुळं छत्रपती शिवाजीमहाराजांना जागतिक दर्जा द्यायचा असेल तर तिथी ही पद्धत कालबाह्य ठरवून तारखेनुसारच शिवजयंती साजरी केली पाहिजे असं मत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलंय.. राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचंही मिटकरी यांनी सांगितलंय..
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटद्वारे तिथीचा हट्ट सोडून शिवजयंती १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याचं आवाहन केलंय.. या पार्श्वभूमीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून तिथी आणि तारखेचा वाद सुरु आहे. याबाबत अनेक कांगोरे असले तरी शिवप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी केली जाते. एव्हाना छत्रपती शिवाजीमहाराजांचे वशंज छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले यांनीही १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती उत्सव साजरा केला आहे. त्यामुळं तमाम शिवप्रेमींची एकाच तारखेला संपूर्ण देशभर व जगभर शिवजयंती साजरी व्हावी अशी इच्छा आहे. याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून शिवप्रेमींच्या भावना कळवू.
१९ फेब्रुवारी १८६९ रोजी रायगडावर जाऊन समाधी शोधून महात्मा फुले यांनी पुण्यात १० दिवसांचा शिवजयंती उत्सव साजरा केला. तसेच बदलापूर येथे १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवजयंती उत्सवाला घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही बदलापूर येथील शिवजयंती उत्सवात हजेरी लावली होती. इतिहासात याबद्दलचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे महाराजांचं कार्य पुढे न्यायचे असेल तर तिथी व तारीख असा वाद न ठेवता १९ फेब्रुवारी हीच शिवजयंती निश्चित करावी असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
१९ फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमादिवशी मुख्यमंत्र्यानी तिथीचा मुद्दा कालबाह्य ठरवून १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी सर्वत्र शिवजयंती होईल असं जाहीर करावं असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.











