मुंबई : महान्यूज लाईव्ह
जगभरात सध्या ज्या महाभयंकर रोगाची चर्चा सुरू आहे आणि चीनमध्ये ज्याची सुरवात झाली, तो कोरोना विषाणूने ग्रस्त रुग्ण मुंबईत आढळल्याने आता भारतापर्यंत कोरोना पोचला आहे, आज मुंबईत 2 संशयित रुग्ण आढळले असून मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईत गुरूवारी रात्री दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. जगभरात या विषाणूविषयी भीतीचे वातावरण आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीदरम्यान हे दोन रुग्ण आढळले असून या दोघांनाही चाचणीसाठी दवाखान्यात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
अर्थात यापूर्वीही स्वाईन फ्ल्यू हा मुंबईतूनच महाराष्ट्रात सर्वदूर पोचला होता. त्याची आठवण यानिमित्ताने होत असून खरोखरच हा विषाणू एवढ्या लवकर लोकसंख्येची घनता असलेल्या भारतात पोचला असल्याने त्याबद्दलची दहशतही मुंबईत तशीच आहे.
जगात दहशत पसरवणारा ‘कोरोना’ व्हायरस नेमका काय आहे?
चीनने वुहानशी संपर्क तोडल्यानंतर कोरोना विषाणूची चर्चा अधिकच वाढली असून भारतातही चीनमधून येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्य़ाची पूर्ण चाचणी झाल्याशिवाय त्याला घरी सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने स्वाईन फ्ल्यूनंतर जगावर घोंगावणारे कोरोना विषाणूचे संकट आता भारतातही चिंतेची बाब बनले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वी कधीच या विषाणूचा माणसाला संसर्ग झाला नाही. मात्र आतापर्यंत चीनमध्ये 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून चीनमध्ये एकट्या वुहानमध्ये 577 हून अधिक जण या विषाणूने बाधित झाले आहेत.
स्वाईन फ्ल्यूप्रमाणेच ताप, खोकला, घशात वेदना व श्वास घेण्यात अडथळे ही कोरोनाची लक्षणे आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणूचे 6 प्रकार माहिती होते. मात्र आता हा सातवा विषाणू `एनसीवोव्ही` हा जगातील संशोधकांपुढे नव्याने आला आहे.
का होताहेत कोरोनासारखे विषाणू?
जगभरात आतापर्यंत एचआयव्ही, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला या विषाणूंना खळबळ उडवली. जनावरांपासून, प्राण्यापासून किंवा पशुपक्ष्यांकडून हा विषाणू माणसांपर्यंत पोचला आहे, आताही कोरोना हा देखील समुद्री जिवांकडूनच माणसांपर्यंत पोचल्याचे सांगितले जात आहे.










