बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यापाठोपाठ सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केल्यानुसार ७ मार्च रोजी मतदान आणि ९ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने गुरुवारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि. १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर ७ फेब्रुवारी रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी वैध उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार असून दि. १० ते २४ फेब्रुवारीदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
अंतिम उमेदवार यादी दि. २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर दि. ७ मार्च रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणुकीची मतमोजणी दि. ९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरु करून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
माळेगावपाठोपाठ सोमेश्वरची निवडणूक
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनल आणि भाजप पुरस्कृत सहकार बचाव पॅनल यांच्यात लढत होत आहे. अद्याप दोन्ही बाजूंची उमेदवार यादी जाहीर झालेली नसली तरी दोन्ही बाजूंनी आतापासूनच प्रचाराला सुरुवात झाली आहे.










