महान्यूज : आजची गझल
आता कुठे तिरंगा लक्षात राहतो
मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो !..
सगळ्या विचारधारा केल्यात पाठ मी
सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो !..
आहेत चंद्रवंशी कंत्राटदार हे
रस्ता परंपरागत खड्डयात राहतो !..
डोक्यावरी कितीदा पडलोय मी इथे
मेंदू कुणाकुणाचा गुडघ्यात राहतो !…
बागेतल्या फ़ुलांशी खेळू नका म्हणे
हा कायदा कुणाच्या लक्षात राहतो ?..
आयुष्य रांगण्यातच सरते हळू हळू
जर राहिलो उभे तर स्वप्नात राहतो !..
त्यालाच पावसाळा कळतो खराखुरा
जो फ़क्त दोन जोडी कपड्यात राहतो !..
झाली जरी कितीही व्हाय्यात लेकरे
ईश्वर जरा जरासा सगळ्यात राहतो !..
गझलकार : सुधीर मुळीक, मुंबई.
सौजन्य : गझलपुष्प समूह, पिंपरी चिंचवड











