युवराज जाधव, महान्यूज लाईव्ह
सांगली : एकीकडे सगळे राज्य कोरोना-कोरोना करीत असताना तिकडे सांगली जिल्ह्यात एक अनोखी घटना सुरूय…४०० वर्षांपूर्वीचे एक झाड जे रस्त्याच्या विकासात जाणार आहे, ते वाचविण्यासाठी भोसे गावातील गावकरी एकत्र आलेत.. तहसीलदारापासून ते राज्याच्या मंत्रीमंडळापर्यंत त्यांच्या मिनतवाऱ्या सुरू आहेत…त्यांचे हे वृक्षप्रेम पाहून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील भारावून गेलेत…त्यांनीही केंद्राला साकडे घातले आहे!!
संपूर्ण राज्यातील अनेक गावे आजही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे जेरबंद झाली असताना पर्यावरण वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या भोसे (ता. मिरज) येथील गावकऱ्यांचे कौतुक राज्यात चर्चिले जाऊ लागले आहे. भोसे येथे एक वडाचे विस्तीर्ण पसरलेले महाकाय झाड आहे. ते झाड ४०० वर्षांपेक्षा जुने असल्याचे सांगितले जाते. सध्या रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग येथून जाणार आहे, या रस्त्याचे काम सुरू असून या रुंदीकरणात हे संपूर्ण झाड नामशेष होणार आहे. या झाडाच्या मोठ्या बुंध्याला गावाने मोठा पार बांधलेला आहे. हा पार या गावातल्या कैक पिढ्यांचा सावलीचा आधार, त्यांच्या कैक सुखदुःखाच्या कहाण्यांचा साक्षीदार ठरला आहे. विकास व्हायलाच पाहिजे, याबाबत दुमत नसणारी आताची पिढी या झाडाच्या जगण्या-मरण्याबाबत मात्र खूपच संवेदनशील बनली आहे. येथून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांनाही हा वटवृक्ष मोठा आधार आहे. त्यामुळे हे झाड वाचवावे अशी गळ या गावकऱ्यांनी प्रशासनास घातली, मात्र कर्तव्यापुढे या झाडाचा बळी जाणार याची कल्पना असलेल्या प्रशासनाने हात झटकल्याने गावकऱ्यांनी आता राज्यापर्यंत धाव घेतली आहे. येथील यल्लमा देवीचे मंदिर गावकऱ्यांच्या, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर वाचले, मात्र झाडाच्या तोडीची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे.
दरम्यान गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली असून अजितदादांनीही त्याची तातडीने दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत सूचना केल्या आहेत. स्वतः आदित्य ठाकरे यांनीही या गावकऱ्यांच्या पर्यावरण प्रेमाला दाद देत नितीन गडकरींना पत्र लिहून हे झाड वाचविण्याची विनंती केली आहे. हे झाड वाचविण्यासाठी उपाययोजना करावी अशी त्यांनी विनंती केली असून आता गडकरी त्याला कसा प्रतिसाद देतात याकडे गावकऱ्यांचे व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.











