दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड, इंदापुर, बारामती व जिल्ह्यातील इतर तालुक्यात कोरोनाचा विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण जिल्ह्यात वाढत चालेला कोरोनाचा संसर्ग अतिशय चिंताजनक असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. भगवान पवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. पवार यांनी आज इंदापूर व दौंडला भेट दिली. पाटस येथे काल कोरोनाने एका ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू झाला. तेथील परिसर प्रशासनाने तातडीने सील केला. आज डॅा.पवार यांनी या परिसराची पहाणी केली. यावेळी ते म्हणाले,जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आरोग्य विभाग ही वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न करीत आहे. सध्या कोरोनाच्या संपर्कात येणाऱ्या रुग्णाचा, संशितांचा शोध घेवून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे, अहवाल पॅाझिटिव्ह आला की परत त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे हे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जिकीरीचे बनले आहे. आरोग्य कर्मचारी हे काम बजावत आहेत. मात्र नागरीकांकडून आरोग्य विभागाला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर आहे त्याठिकाणी नागरीकांनी स्वतहुन खबरदारी व दक्षता घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद करून सहकार्य केले पाहिजे. नागरीकांनी सहकार्य केले तर आरोग्य विभागाला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणता येईल. कोरोना बाधितांच्या व्यक्तींनी स्वतःहून आरोग्य विभागाशी संपर्क साधला पाहिजे. कोरोनाच्या संपर्कातील साखळी तोडणे महत्वाचे आहे. यासाठी संबंधितांनी स्वतःहून होम क्वारंटाईन राहिले पाहिजे. जिल्हयात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर औषध उपचार व आवश्यक ती आरोग्य साहित्यांचा पुरवठा उपलब्ध आहे. यामुळे रूग्णांची तातडीने तपासणी व उपचार होत आहे.










