बारामती : महान्यूज लाईव्ह
सहकारातील अडचणी लक्षात घेत राज्यातील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते अजितदादा पवार आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक छत्रपती कारखान्यासाठी एकत्र येण्याचे संकेत तर मिळाले, मागील आठवड्यातच या सत्तांतराचा मूहूर्त निघेल असा होरा होता. मात्र हा एकीकरणाचा व सत्तांतराचा मुहूर्त आता नेमका कशात अडकलाय? असा प्रश्न कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना पडला आहे.
छत्रपती कारखान्याची निवडणूक कोरोनाचे संकट संपल्यानंतर होणार आहे. जिल्ह्यातील सोमेश्वर, घोडगंगा, भिमा पाटस, कर्मयोगी या कारखान्यांसह छत्रपतीचीही निवडणूक होणार आहे. अचानक कोरोनाचे संकट समोर आल्याने सहकारातील सर्वच निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मात्र निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी छत्रपती कारखान्याबाबत एक वेगळाच विषय पुढे चर्चेत आला. गेली १८ वर्षे विरोधात असलेल्या राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना कारखान्यात सत्तेत सामावून घेण्याचा व त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची सांगड घालून छत्रपती कारखान्याला सोमेश्वरप्रमाणेच पूर्वपदावर आणण्याचा हा विषय होता. अचानक हा विषय पुढे आला व त्यानंतर वेगाने घडामोडी घडत गेल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यापक दृष्टीकोनातून राज्यातील सहकाराला एक वेगळे वळण देऊन सहकारातील बेरजेचे राजकारण यामध्ये सुरू झाले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत तसेच अगदी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमवेतही यासंदर्भात बैठका झाल्या. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासमवेतही यासंदर्भात बैठक झाली. त्यानंतर अगदी एका आठवड्यातच हे सत्तेचे हस्तांतर होऊ शकते अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली. मात्र त्यानंतर दुसरा आठवडा संपत आल्यानंतरही या राजकीय व सहकाराच्या स्तरावर शांतता आहे. याउलट कारखान्याच्या संचालक मंडळाने नियमित संचालक मंडळाच्या बैठका घेऊन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवले आहे. तूर्त राजकीय आघाडीवर सामसूम असली तरी खात्रीलायक सूत्रांनी जे ठरले आहे, ते होणारच आहे असे संकेत दिले आहेत. मात्र दुसरीकडे जाचक यांच्या समर्थकांना मात्र कारखान्याच्या काही संचालकांना जाचक सत्तेत नको असे वाटत असल्याने त्यांच्याविरोधात कुजबूज मोहिम चालवली जात असल्याची शंका आहे. त्यातूनच हंगामाची व्यवस्थित तयारी करण्याची वेळ असताना वेळ घालवला जात असेल व ऐन हंगाम सुरू होण्याच्या बेतात जबाबदारी दिली तर ती घेण्यात काही अर्थ नाही असा सूर या समर्थकांनी लावला आहे. अर्थात यावर जाचक अथवा राष्ट्रवादीतील कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कार्यक्षेत्रातील सभासद मात्र जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा अशी मते व्यक्त करीत आहेत.
शेतकरी कृती समिती पुन्हा सक्रीय
दुसरीकडे गेल्या काही दिवसांत या सर्व घडामोडींवर शांत असलेल्या शेतकरी कृती समितीने आज मात्र आक्रमक पवित्रा घेत कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने पत्रकारांना दिलेल्या माहितीवर 0आक्षेप घेत संचालक मंडळाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मागील हंगामात कारखान्याच्या कामकाजासाठी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवली होती अशी माहिती दिल्यानंतर आज संध्याकाळी अशी मालमत्ता गहाण ठेवली होती काय? अशी विचारणा करीत त्यासंदर्भातील पुरावे देण्याचे लेखी पत्र मागत पृथ्वीराज जाचक यांच्यासह शिष्टमंडळाने कारखान्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.










