विशाल कदम : महान्यूज लाईव्ह
पुणे : आंबेगाव तालुक्यात रविवारी दुपारी सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा झालेला खून हा व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून झालेला आहे असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी पकडलेल्या सात जणांची वय पाहिली तर ती विशीच्या आत बाहेर आहेत.
चेतन सत्यवान गायकवाड (वय 19 राहणार आनंदवाडी नारायणगाव), राम सुरेश जाधव (वय 22 राहणार आंबेठाण ता. खेड) सौरभ कैलास पोखरकर (वय 19 वर्ष राहणार डोबी मळा मंचर), आकाश संतोष खैरे (वय 20 वर्ष, रा. वारूळवाडी तालुका जुन्नर) लुट्या उर्फ तुषार नितीन बोराडे (रा. मोरडेवाडी ता. आंबेगाव) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश असून आणखी दोन जण फरार आहेत. त्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार अजून फरार असलेल्या संतोष जाधव याने व्हाट्सअप वर स्टेटस ठेवून तुला सूर्य उगवायच्या आत संपवतो असे स्टेटस ठेवले होते. त्यावर ओंकार उर्फ राण्या याने त्याच्या स्टेटसला प्रत्युत्तर म्हणून, ‘तू जिथे भेटणार, तिथे तुला ठोकणार, तू कुठे पण असुदे’ असे स्टेटस ठेवले होते. त्यावरून चिडलेल्या या टोळक्याने मंचर परिसरात येऊन राण्या बाणखेले ला गोळ्या घालून ठार केले.
पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणात सहभागी असलेल्या सात जणांना अटक केली असून उर्वरित दोघे जण अद्याप फरार आहेत पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे पुढील तपास करत आहेत.











