कावळ्यांनी मॉलबाहेर केलेल्या कोंडीच्या व्हिडीओचे सत्य काय?
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत असून कावळ्यांनी एका मॉलबाहेर वाहनांची कोंडी केलेली दिसते, ही जगाच्या अंताची सुरवात मानायची का? असा आशय टाकून हा व्हिडीओ व्हायरल होतोय, परंतू व्हिडीओ खोटा आहे. सौदी अरेबियातील नाही.
सध्या लॉकडाऊनच्या काळात मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने जंगलातील प्राणी, पक्ष्यांनी मुक्तपणे विहार करायला सुरवात केली. प्राणी, पक्षी अगदी शहराच्या चौकातही येऊन बिनधास्तपणे फिरत असल्याचेही फोटो, व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेत. आताही सौदी अरेबियात एका मॉलबाहेर कावळ्यांची प्रचंड गर्दी झाली असून कावळ्यांनी वाहनांची कोंडी केली आहे. वाहनांतून कोणाला बाहेर येऊ देत नाहीत, रस्त्यावरही कावळे असल्याने त्यांचा अघोषित रास्ता रोको सुरू आहे. मॉलमधून कोणी आल्यास कावळे त्यास टोचा मारून हैराण करीत आहेत असा तो व्हिडीओ आहे.
हा व्हिडीओ व्हायरल करताना संबंधितांनी हिंदू धर्मातील कावळ्याचे महत्व विशद करीत कावळ्यांचा हा सामूहिक हल्ला म्हणजे जगाच्या अंताची सुरवात असल्याचे म्हटले आहे. एखाद्या भयपटाप्रमाणे हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्यास प्रतिसाद दिला आहे.
मात्र प्रत्यक्षात हा व्हिडीओ सौदी अरेबियातील नाही. तो १४ डिसेंबर २०१८ रोजीचा आणि अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन येथील वॉलमार्ट या जीवनावश्यक वस्तूच्या मॉलबाहेरचा आहे. तेथे खायला मिळते या कारणाने गर्दी केलेल्या या कावळ्यांची संख्या प्रचंड असल्याने त्यावेळी प्रवाशांची, ग्राहकांची कोंडी झाली होती.
हा व्हिडीओ येथे पहा…











