फणसामुळे केरळमध्ये कळून आला करोनाचा रुग्ण
ऐकावं ते नवलंच….
महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
कोरोना देशात आला आणि हळूहळू चित्रविचित्र घटना घडू लागल्या. कधी नव्हे ते दारुड्यांना किंमत आली..नथीचा नखरा याच काळात घडला..पण आणखी एक गंमतीचा प्रकार पुढे आलाय..केरळमध्ये फणस काढायला गेल्यानंतर फणसच एकाच्या डोक्यात पडला आणि त्यानंतर दवाखान्यात पोचलेला तो रुग्ण चक्क कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.
केरळमधील कासारगोड जिल्ह्यात ही घटना घडली. सध्या चिकन, मटणाच्या भावात घसघशीत वाढ झाल्याने मांसाहार परवडेनासा झाला आहे. त्यातच फणसाचा हंगाम सुरू झाला असून चिकन, मटणाला पर्याय म्हणून फणसाची मागणी वाढली आहे. या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी
सध्या फणसाची विक्री जोरात सुरू आहे. केरळमधील या कासारगोड जिल्ह्यातील बेलूर या छोट्या गावातील फणस बागेच्या मालकाने फणस काढण्याचा प्रयत्न केला. यात त्याच्या डोक्य़ावर फणस आदळला. त्याचा वेग व वजन एवढे जबरदस्त होते की, त्या व्यक्तीला दवाखान्यातच दाखल करावे लागले. त्याच्या मज्जारज्जूला अपाय झाल्याने हातपायातील संवेदना हरपून गेली. त्याची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याची तपासणी केली असता त्यास कोरोना झाल्याचे समजले आणि डॉक्टरांनी देखील डोक्याला हात लावला. मग काय, कोरोनाचा उपचार आधी की मणक्याचा याविषयी डॉक्टरांचा खल सुरू झाला.










