खडकवासल्यातून आवर्तन सोडले
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शेतीपिके व पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून जलसंपदा विभागाने शनिवार (ता. २३) पासून टेल टू हेड या पद्धतीने उन्हाळी आवर्तन सोडले आहे, त्यामुळे पुणे जलसंपदा मंडळातील सर्व अधिकाऱ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले.
हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने आज यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली. त्यामध्ये नमूद केल्यानुसार पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पुणे जलसंपदा मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यासाठी शेतीसाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. खडकवासला साखळीतील सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने खडकवासला कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी भूमिका त्यांनी मांडली. त्या चर्चेदरम्यान ३ दिवसात आवर्तन सोडण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले, त्यानंतरही याबाबत पाटील यांचा जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा चालू होता. त्यानुसार आवर्तन सुरू केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या आवर्तनाचा लाभ इंदापूर तालुक्यातील बेडशिंगे, वडापुरी, गोखळी, तरंगवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, कौठळी, बळपुडी, लोणी देवकर, व्याहळी, न्हावी, डोंबळवाडी, थोरातवाडी, मराडेवाडी, गोसावीवाडी, रुई, कळस, पिलेवाडी, निरगुडे, अकोले, पोंधवडी, मदनवाडी आणि शेटफळगढे आदी गावातील शेतीला होणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.










