विशाल कदम:- महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गालगत पार्किंगला थांबलेल्या गाड्यांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाक वस्ती(ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एम आय टी कॉर्नरच्या परिसरात बुधवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अटक केली.
योगेश नवनाथ गायकवाड (वय-३०, रा. गोकुळधाम कॉलनी, मांजरी, ता. हवेली. मुळगाव मु. पो. चटारा, ता. बीड, जि. बीड), गणेश विठ्ठल जाधव, (वय-४९, रा. कुलर बायो प्लॉटच्या बाजुस, ग्रीन भंडारी हाईट्स, मुंढवा, ता. हवेली) सौरभ सुरेश जगताप (वय १९, रा. मांजरी म्हसोबा वस्ती, गल्ली नं. १, गावठी निवास मांजरी, हडपसर), गणेश शरगप्पा शेरे (वय- २०, रा. लोणकर वस्ती पवन मेडीकल हुड, सोसायटी समोर, केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गुजरवस्ती परिसरात श्री दत्त ट्रान्सपोर्टच्या पार्किंग ला लावलेल्या चार ट्रकमधून डिझेलची चोरी झाली होती.
याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मिकाशी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या पोलीस हवालदार नितिन गायकवाड, राजेश दराडे, गणेश सातपुते आणि श्रीनाथ जाधव यांचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाला डिझेलची चोरी करणारे योगेश गायकवाड, गणेश जाधव, सौरभ जगताप आणि गणेश शेरे हे चारही संशयित पुणे सोलापुर महामार्गाच्या शेजारी असलेल्या एमआयटी कॉलेजजवळील रेल्वेच्या बोगदयाजवळ थांबले असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, वरील चारही आरोपी सदर ठिकाणी आड बाजूला थांबल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक माहिती विचारली असता, त्यांचा गुजरवस्ती येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निश्चीत झाले आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्यांमधील डिलेझची चोरी होण्याचे प्रमाण जास्त वाढले होते. मागील चार दिवसांपूर्वी उरुळी कांचन परिसरातील सहा आरोपींना डिझेल चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यातच बुधवारी (ता. १६) आणखी चार आरोपींना पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.











