बारामतीत दत्तात्रय थोरात व दिलीप सोनवणे यांचा सेवानिवृत्ती सोहळा!
बारामती : खाकी वर्दी मध्ये सुद्धा माणुसकी असते,अनेक संकटे झेलत,समाज्यातील स्थित्यंतरे सांभाळत दिलेली जवाबदारी समर्थपणे पेलत सहकारी पोलीस काम करतात.. त्यांची देखील कधी कधी मोठ्या पदावर जायची इच्छा असते… बारामतीत अशीच सहकारी म्हणून काम केलेल्या फौजदार पदावरील अधिकाऱ्याची मनातील इच्छा पोलीस निरीक्षकांनी पूर्ण केली अन् त्यांना निरोप देताना एक तास का होईना ‘पोलीस निरीक्षक’ बनवले आणि त्या फौजदारांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले…!
शहर पोलीस ठाण्याचे फौजदार दिलीप सोनवणे व सहायक फौजदार दत्तात्रय थोरात यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, परिक्षाविधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे व अधिकारी कर्मचारी व कुटूंबीय उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सेवानिवृत्ती सत्कार नंतर सोनवणे व थोरात याना अनोख्या पद्धतीने निरोप दिला. पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीवर बसवून एका तासासाठी त्यांना कार्यभार सांभाळण्यास दिला. त्यामुळे कुटूंबीयांसमवेत फोटोसेशन करताना व निरोप घेताना हे दोघेही भावनाविवश झाले होते.
सोनवणे व थोरात यांनी उत्कृष्ट सेवा बजावली, त्यामुळे ते अनेक पदकांचे मानकरी ठरले व पोलीस खात्याची मान उंचावेल अशी कामगिरी केली असून त्यांचे काम आदर्शवत असल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. मोर्चा, आंदोलन, निवडणुका आदी ठिकाणी बंदोवस्त केला. जीव धोक्यात घालून अनेक आरोपींना पकडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जवाबदारी समर्थपणे पार पाडली. सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे सेवा निवृत्ती यशस्वीपणे होत आहे याचा आनंद असल्याचे दिलीप सोनवणे व दत्तात्रय थोरात यांनी सांगितले.











