ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
देहू : देहू येथील सांगुर्डी या गावात विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात काल एका मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली. यात 8 गाभण मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 ते 16 मेंढ्या जखमी झाल्या. यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाल्याने सांगुर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संध्याकाळी 7 च्या दरम्यान झालेल्या पावसात कडकडाटासह वीज कोसळली आणि ही घटना घडली. अमृता कर्हे यांचा मेंढ्यांचा कळप असून अमृता कर्हे यांचे या घटनेमुळे जवळपास दोन लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर सांगुर्डी गावचे पोलिस पाटील सोनम काळे, गावचे सरपंच वसंत भसे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व नागरिकांनी अमृता कर्हे यांना धीर दिला.
या दरम्यान, सांगुर्डे गावचे सरपंच वसंत भसे यांनी अमृता कर्हे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.











