इंदापूर : महान्यूज लाईव्ह
चिंकारा हरणाची शिकार करून पळून जात असलेल्या दोघांना वन कर्मचाऱ्यांनी पकडले. महेश जंगलु माने (वय 40 रा. सणसर, ता. इंदापूर) व दत्तात्रय पोपट पवार (वय 42 रा. बोरी ता. इंदापूर) या दोघा जणांना वन खात्याने ताब्यात घेतले. या दोघांकडून शिकारीचे साहित्य आणि शिकार केलेल्या मृत हरणाचा देखील जप्त केले आहे.
यासंदर्भात तालुका वन अधिकारी राहुल काळे यांनी माहिती दिली. तालुक्यातील काझड वन हद्दीच्या गट नंबर 345 व कळस वन हद्दीच्या गट नंबर 40 लगत वनखात्याचे कर्मचारी बोरी अकोले रस्त्यावर गस्त घालत होते.
गस्त घालत असताना त्यांना कोणीतरी दोघेजण दुचाकीवरुन हरणाची शिकार घेऊन जात असताना दिसले. त्यावरून त्यांनी पाठलाग केला व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने या दोघांना पकडले. या दोघांकडून एक बंदूक, सहा जिवंत काडतुसे, एक पुंगळी व एम एच 42-एव्ही 2111 या क्रमांकाची दुचाकी जप्त केली. या दोघांनाही अटक केली असून. त्यांच्यावर वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अशोक नरोटे, वनरक्षक पूजा काटे, वनमजूर ज्ञानदेव ससाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या दोघांनाही कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून यांच्याकडे तपास सुरू आहे. शिकार केलेल्या हरणांची ते विक्री कोठे करणार होते आणि इतर काही आरोपी यांना सामील होते का? याची चौकशी केली जाणार असल्याचे राहुल काळे यांनी सांगितले.











