सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुण्यात विश्रांतवाडी जवळील धानोरे येथे कोविड सेंटर रुग्णहक्क परिषदेच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटल निर्माण केले आहे. दर्जेदार उच्चशिक्षित तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या हॉस्पिटल सेवेचा पुणे शहरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुण्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.
डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज covid-19 हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटलची रचना आदर्शवत आहे. अल्प कालावधीमध्ये शासकीय सर्व परवानग्यांची पूर्तता करून उभारलेले हे कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे कोविड हॉस्पिटल असल्याचे सांगत त्यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी कोविड रुग्णांवर करावयाच्या उपचारांसंबंधी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. नागरिकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, डॉ.मेघना सणस, डॉ.सलीम आळतेकर, डॉ.नलिनी नागरे, डॉ. प्रीती उपश्याम, व्यवस्थापक अर्चना प्रधान,अपर्णा साठे, गिरीश घाग, विकास साठ्ये आदी उपस्थित होते.











