इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भिगवण स्टेशन येथे सापडलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भिगवणसह आसपासचा परिसर सील केला असून ११ जणांची कोरोना चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भिगवण येथे भेट देऊन यासंदर्भातील आढावा घेतला.
भिगवण स्टेशन येथील महिला रुग्णावर सध्या पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेने भिगवणमध्ये पोचून दोन्ही दवाखाने सील केले. तसेच तेथील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या. यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांसह डॉक्टरांचीही चाचणी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार ११ जणांची तपासणी आजच केली जाणार असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.
आज भिगवण स्टेशन येथे सापडलेल्या महिला रुग्णामुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली. इंदापूर तालुक्यात प्रशासनाने केलेल्या आखीव नियोजनामुळे आजवर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले, तरीदेखील सोलापूर महामार्ग शेजारी असतानाही इंदापूर तालुक्यात कोरोना पोचला नसल्याने इंदापूरकर खुश होते. मात्र इंदापूर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याने इंदापूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज पोलिस व महसूल यंत्रणेने भिगवण स्टेशन परिसराची संचारबंदी तीव्र केली.
भरणे यांची भेट
वन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज तातडीने भिगवण येथे भेट दिली. येथील ग्रामपंचायतीत त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला व कोणत्याही परिस्थितीत आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. कोरोनाचा रुग्ण आढळला असला तरी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी, संचारबंदीत प्रशासनास सहकार्य करावे व कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.











