महान्यूज संवाद फेसबुक लाईव्हमध्ये साधणार चाहत्यांशी संवाद..
बारामती : महान्यूज लाईव्ह
अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उरलेल्या महान्यूज लाईव्हच्या माध्यमातून लॉक डाऊनच्या काळात विविध मान्यवरांशी थेट संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.. उलटसुलट, झुंड, गांधी विरुद्ध गांधी या गाजलेल्या नाटकांसह माझ्या नवऱ्याची बायको, लक्ष्मी vs सरस्वती या मालिकांमधील भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने बुधवार दि. २९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महान्यूज लाईव्हच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह संवाद साधणार आहेत..
लॉक डाऊनच्या काळात वाचकांसाठी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांशी संवाद व्हावा या उद्देशानं महान्यूज संवाद हा उपक्रम हाती घेण्यात आलाय.. या महान्यूज संवाद या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर वाचकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.. आतापर्यंत आमदार रोहित पवार, अभिनेते संदीप पाठक, दिग्दर्शक महेश टिळेकर या मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन संवाद साधला आहे.बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाच वाजता अभिनेते किरण माने हे महान्यूज संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बारामती तालुक्यातलं आजोळ असलेल्या आणि मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी येथील किरण माने यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून स्वतःला सिद्ध केलं आहे.. आजपर्यंत त्यांना त्यांच्या दर्जेदार अभिनयाबद्दल अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अशोक सराफ, भक्ती बर्वे, प्रशांत दामले, स्मिता तळवलकर, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, अमृता सुभाष अशा नामवंत कलाकारांसोबत तसेच चंद्रकांत कुलकर्णी, प्रदीप मुळ्ये, मंगेश कदम, केदार शिंदे, कुमार सोहोनी अशा दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले आहेत.
ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेले किरण माने खास महान्यूजच्या वाचकांशी संवाद साधणार आहेत. वाचकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांनाही ते उत्तरे देणार आहेत. तर आजच महान्यूज लाईव्हचे फेसबुक पेज लाईक करून या संवाद कार्यक्रमात सहभागी व्हा…










