बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरातील समर्थनगर येथील एका रुग्णास कोरोनाची लागण झाल्याचे काल समोर आले आहे. त्यानंतर हा रुग्ण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बाधित व्यक्तीला कोरोनाची लागण कशी झाली याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आज प्रशासनाने या रूग्णाशी संबंधित १२ जणांना तपासणीसाठी पुण्यातील औंध रुग्णालयात पाठवले आहे. त्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच बारामतीकरांवरील कोरोनाची दहशत कमी होणार आहे.
बारामती शहरातील समर्थनगर येथे वास्तव्यास असलेल्या भाजी विक्रेत्याच्या कुटुंबियातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलत या परिसराला सील केले आहे. तसेच पाच किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. दरम्यान, संबंधित रुग्ण आजारामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घरातच आहे. त्यामुळे या रुग्णाला कोरोनाची लागण नेमकी कशी झाली याबद्दल प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाकडून या परीसरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. तसेच या परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. सद्यस्थितीत नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याबरोबरच घराबाहेर जाणे पूर्णपणे टाळावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी केले आहे. दरम्यान, या रूग्णाशी संबंधित १२ जणांना आज पुण्यातील औंध रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यांच्या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी दिवसेंदिवस कोरोनाचे संकट बारामती आणि परिसरात वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांनी घराबाहेर न येण्याचे आवाहन केले जात आहे.











