बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील शेती पंपांकडे 40 हजार कोटींहून अधिक थकलेली थकबाकी व एकूण 63 हजार कोटींची थकबाकी असल्याने मेटाकुटीला आलेल्या महावितरणने या थकबाकी वसुलीसाठी कारखान्यांचा आश्रय घेतला. त्यापाठोपाठ महावितरणने ग्रामपंचायती व महिला बचत गटांना ही थकबाकी वसुली करा आणि दहा टक्के मिळवा अशी योजना सुरू केले आहे.
राज्यातील कृषिपंपांच्या वीज देयकांची थकबाकी मिळविण्यासाठी महावितरणने थकबाकीवरील दंड-व्याज माफी आणि ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कमही माफ करण्याचे कृषी धोरण जाहीर केले आहे. याद्वारे कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी आता साखर कारखाने, ग्रामपंचायती, महिला बचत गटांसह सहकारी संस्थांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.
यामध्ये साखर कारखाने महिला बचत गट व सहकारी संस्थांना दहा टक्के कमिशन तर ग्रामपंचायतींना 30 टक्के कमिशन दिले जाणार आहे यात 30 टक्के कमिशन मधून ग्रामपंचायतींमधील पायाभूत वीज वितरण करण्याची कामे केली जाणार आहेत. महावितरणची 63 हजार कोटींची थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे.











