बारामती – .येथून विलगीकरण केलेल्यांपैकी दोघांचा इतिहास लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुण्याला तपासणीसाठी पाठवल्यानंतर एकामध्ये कोणतीच लक्षणे नसल्याचे निष्पन्न झाले असून दुसऱ्याची तपासणी आज होणार आहे, त्यामुळे बारामतीत कोठेही कोरोना रुग्ण आढळलेला नसून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी केले आहे.
बारामतीत विदेशातून आलेल्या शहरातील 18 जणांना व ग्रामीण भागातील 10 जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर वैद्यकीय पथकाने निगराणी ठेवली आहे. त्यांच्यामध्ये आजअखेर कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र त्यापैकी दोघांना त्रास होत असल्याने त्यांना प्रतिबंधक उपाय म्हणून आरोग्य अधिकाऱ्यांनी पुण्यास पाठवले. त्यावरून बारामती तालुक्यात अफवांचे कल्लोळ माजले. आज बारामतीत प्रचंड भितीचे वातावरण होते. मात्र रात्री त्या दोघांपैकी एकास परत माघारी पाठवले असून त्याच्यात कोणतीही लक्षणे नसल्याचे दवाखान्याने स्पष्ट केले. तर दुसऱ्यास त्याने केलेल्या आरोग्याच्या तक्रारींची दखल घेत तपासणीसाठी दाखल करून घेतले आहे, आज त्याच्या घशाच्या द्रवाची तपासणी होणार असून उद्या त्याचा तपासणी अहवाल येईल. अर्थात त्याला केवळ खोकला, घशाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. मात्र तोपर्यंत बारामतीत कोरोनाचे रुग्ण आढळळ्यापर्यंत अफवा पसरल्या आहेत.
यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले असून दक्षता घेण्याची गरज स्पष्ट केले. मात्र दक्षता घेण्याचा अर्थ अफवांना खतपाणी घालणे असा नाही. आपल्या येथे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्यामध्ये दक्षता घेण्याचा पर्याय आहे, त्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, तसेच जे विदेशातून आलेले आहेत, त्यांनी स्वतःहून स्वतःची तपासणी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे.










