माळेगाव : महान्यूज लाईव्ह
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या स्थापनेपासूनच महिला सशक्तीकरणाची हाक पद्मश्री अप्पासाहेब पवार व ज्ेयष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आणि त्यानंतरच्या आजवरच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी सातत्याने महिला सक्षमीकरणाला महत्व दिले..तोच वसा आणि वारसा कायम ठेवत ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी राज्यातील महिलांना शारदानगरमध्ये गौरव करण्याची परंपरा सुरू केली..यावर्षी या परंपरेचे दीड दशक पूर्ण झाले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शारदानगरमध्ये महिला दिनाच्या एक दिवस आधी २१ जणींना गौरविण्यात आले.
भारतातील पहिले निवासी दिव्यांग महाविद्यालय सुरू करणाऱ्या जाई खामकर, विदर्भातील डॉ. प्राजक्ता कोळपकर, जयश्री नलगे, पुष्पांजली मगर, नेहा म्हैसपूरकर, रुपा पाटील, वर्षा चव्हाण, अर्चना देशमाने, मनस्वी पाटील, रोहिणी पाटील, रुक्मिणी दराडे, अश्विनी अकोलकर, पिंकी पवार, अश्विनी धोंगडे, अपर्णा देशमुख, संगीता नेटके, विमल सावंत, अर्चना काटे, माधुरी खांडवे या त्या २१ जणी आहेत, ज्यांच्या सामाजिक, राजकीय, कृषी, सांस्कृतिक योगदानाची दखल ट्रस्टने घेतली.
शारदानगर (ता. बारामती) येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अप्पासाहेब पवार सभागृहात हा देखणा कार्यक्रम पार पडला. यावेळी शारदा महिला मंचाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या २१ महिलांचा सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते. गेली पंधरा वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कौतुक करतानाच कोणतेही काम दिर्घकाळ असावे, त्यामध्ये समाजाच्या सर्वंकष विकासाचा हेतू असावा व आपले काम हे वैयक्तिक न राहता ते समाजाभिमुख राहावे यासाठी प्रयत्नशील राहता आले पाहिजे. असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात राज्यातील २१ कर्तृत्ववान महिलांचा साडी, चोळी, ओटी व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात चार महिला बचत गटांना अॅग्रो पणन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमार्फत अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले. यावेळी सुनंदा पवार यांनी बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील ७० बचत गटांना १.१८ कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती मरकळे, प्रा. संध्या अडागळे यांनी केले. प्रा. ज्योती अवधानी यांनी आभार मानले.










