बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आज बाळासाहेब पाटील तावरे यांची तर उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे माळेगावसाठी न्यायालयापर्यंत पोचलेला वाद आपोआपच निकाली निघाला आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास वेळ काढून शनिवारी संध्याकाळी विद्या प्रतिष्ठानच्या विश्रामगृहावर नवनिर्वाचित संचालक व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. आज सकाळी ठरल्यानुसार माळेगाव कारखान्या्चया नवनिर्वाचित संचालकांशी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्षपदासाठी बाळासाहेब तावरे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी कोकरे यांचे नाव सुचविले, त्यास सर्व संचालकांनी एकमताने पाठींबा दिला आणि निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
माळेगावच्या निवडणूकीतील प्रचारादरम्यान राष्ट्रवादीने मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पाच वर्षापेक्षा बाळासाहेब तावरे यांच्या कार्यकाळात माळेगावने सर्वाधिक भाव दिला होता हा मुद्दा जास्त तापवला होता. तसेच बाळासाहेब तावरे यांनी काटकसरीने कारखाना चालविल्यानेच कारखाना सुस्थितीत आला होता याही मुद्द्याला हवा दिली होती. माळेगावच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. ज्येष्ठ संचालक अॅड. केशवराव जगताप, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, अनिल तावरे यांच्यासह इतरही संचालकांची नावे चर्चेत होती. पक्षश्रेष्ठींनी अनुभवाला पसंती देऊन बाळासाहेब तावरे यांच्या खांद्यावर कारखान्याची धुरा दिली आहे.
माळेगावची घडी बसविण्यासाठी प्रयत्न करणार
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ करू अशी ग्वाही देण्याबरोबरच माळेगाव कारखान्याच्या सभासदांचे जाहीर आभार मानले. माळेगाव कारखान्यातील फसलेले विस्तारीकरण, डिस्टीलरीचे विस्कळीत कामकाज व सहवीजनिर्मितीबाबत बिघडलेले धोरण या सर्वांची घडी बसविण्यासाठी मेहनत घेण्याचेही आश्वासन दिले.
माळेगावची चौकशी किती दिवसात पूर्ण होणार?
माळेगावच्या निवडणूकीतील प्रचारादरम्यान तुम्ही पॅनेल निवडून द्या, कारखान्यातील कारभाराची चौकशी लागलीच करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. आता अजित पवार दिलेल्या आश्वासनानुसार किती दिवसांत ही चौकशी पूर्ण करण्याची संबंधितांना डेटलाईन देणार याची चर्चा आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. माळेगावबाबत भाजपच्या नेत्यांनी केवळ गुलाबी चित्र दाखवून ते रंगवले होते, प्रत्यक्षात कारखान्याचा कारभार वेगळ्याच पध्दतीने झाला असा आरोप राष्ट्रवादीने प्रचारादरम्यान केला होता. त्यास प्रतिसाद देत कार्यक्षेत्रातील सभासदांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवत निळकंठेश्वर पॅनेलच्या हातात कारखान्याची सूत्रे सोपवली.










