सोलापूर : महान्यूज लाईव्ह
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या उमेदवारांमध्येच मुख्य लढत होईल असे चित्र जरी निर्माण केले जात असले, तरी प्रत्यक्षात ‘ग्राउंड रियालिटी’ मात्र काही वेगळीच असल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. पदवीधर मतदारसंघ हा कारखानदारांचे राजकारणात पुनर्वसन करण्यासाठी नसून पदवीधरांचे प्रश्न सोडवणरा योग्य प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठवण्यासाठी आहे हे आवाहन करणाऱ्या उमेदवार नीता ढमाले यांना पदवीधर मतदारांनी चांगलेच डोक्यावर घेतले असून भाजप-राष्ट्रवादीसमोरच्या डोकेदुखीत मात्र वाढ झाल्याचे प्रत्यक्षात पहायला मिळत आहे.
उमेदवार नीता ढमाले यांच्या प्रचारार्थ बार्शी (जि.सोलापुर) येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीधर मेळाव्याला मतदारांनी चांगलीच गर्दी केली असून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपेक्षा मतदारांमध्ये नीता ढमाले यांचीच अधिक लोकप्रियता असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
पदवीधर मेळाव्यात मतदारांना संबोधित करताना नीता ढमाले यांनी सांगितले की, ‘घटनेने राजकीय पक्षांसाठी विधानसभेची रचना केली आहे, मात्र विधानपरिषदेचा पदवीधर मतदारसंघ हा राजकीय लोकांसाठी नसून पदवीधरांच्या खऱ्या प्रतिनिधींसाठी ठेवला आहे. घटनेने पदवीधरांना विशेषाधिकार वापरुन आपला प्रतिनिधी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र आजपर्यंत कुठल्याही राजकिय पक्षाने पदवीधरांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत केले नाही, तेच काम करण्यासाठी मी इथे आली आहे.
पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार देताना कुठलाही पक्ष किंवा संघटना पदवीधरांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेत नाही किंवा त्यांचे मत विचारात घेत नाही. जर उमेदवार देतानाही तुम्हाला विचारात घेतले जात नसेल, तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित पक्ष, संघटना कितपत गांभीर्याने काम करतील हा प्रश्न आहे.
कुणीही निवडून आले तरी आपल्याला काही फरक पडणार नाही हा गैरसमज सर्वप्रथम दूर करा. घटनेने दिलेल्या विशेषाधिकाराचे महत्व ओळखून स्वतःच्या भवितव्यासाठी योग्य उमेदवाराला मत द्या. राजकीय पक्षांनी थोपवलेला उमेदवार निवडून आपले भवितव्य राजकिय पक्षांच्या हातात जाऊ देऊ नका. पदवीधरांनाही स्वाभिमान आहे हे दाखवून द्या. जोपर्यंत तुम्ही मतपेटीद्वारे तुमचे अस्तित्व दाखवणार नाही, तोपर्यंत तुमचा वापर केवळ मतदानापुरताच केला जाईल हे लक्षात घ्या.
आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांचे लोक पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात गेले, पण त्यांच्या कामाविषयी तुम्ही समाधानी आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. तुमचे उत्तरजर ‘नाही’ असे असेल तर हीच बदल घडवण्याची योग्य वेळ आहे. आता जर तुम्ही चुकीचा उमेदवार निवडून दिला तर भविष्यात पश्चाताप करुन काही उपयोग होणार नाही, त्यासाठी आताच योग्य उमेदवार निवडून द्या. मी तुम्हाला वचन देते की मला जर तुम्ही काम करण्याची संधी दिली तर तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही.’
पदवीधर मतदारांनाही ढमाले यांचे मुद्दे भावत असून आपण बदल घडवू अशा प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केल्या. एकंदर नीता ढमाले यांच्या उमेदवारीमुळे पुणे पदवीधर निवडणूकीत ‘काटे की टक्कर’ अनुभवायला मिळणार असे दिसत आहे.











