राष्ट्रवादीच्या संचालकांनी घातली माळेगावच्या प्रशासकीय कार्यालयावर धाड;
३० सभांच्या इतिवृत्तामध्ये गोलमाल होत असल्याचा आरोप..?
माळेगाव : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना ‘राष्ट्रवादीने’ धक्का दिलेला असतानाच आज अजब प्रकार समोर आला आहे. कारखान्याच्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तब्बल ३० सभांच्या इतिवृत्तामध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या विद्यमान संचालकांनी प्रशासकीय कार्यालयात धाड घातली. मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी नवीन अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होण्यापूर्वीच मागील सभांचे इतिवृत्त कायम करण्यासाठी ७ मार्च रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कोणत्याही धोरणात्मक निर्णयाला मंजुरी देण्यास राष्ट्रवादीच्या संचालकांनी विरोध दर्शवला आहे. त्यावरून दोन्ही गटात चांगलीच खडाजंगी झाली.
माळेगाव कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा दारुण पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसने २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवला. नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड येत्या ८ मार्चला होणार आहे. तत्पूर्वी निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मागील पाच वर्षांच्या कारभाराच्या चौकशीची सूत्रेही वेगात फिरू लागली आहेत. मावळते अध्यक्ष रंजन तावरे यांनी नवीन निवडी होईपर्यंत कामकाज करून द्यावे अशी मागणीही केली आहे.
अशातच रंजन तावरे यांनी नवीन निवडी होण्यापूर्वी म्हणजेच ७ मार्च रोजी मागील सभांच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यासाठी सभा आयोजित केली आहे. मात्र या सभेपूर्वीच जुन्या इतिवृत्तामध्ये फेरफार होत असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित संचालकांनी माळेगाव कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात धाड टाकली. राष्ट्रवादीच्या संचालकांनी येत्या ७ मार्चला होणाऱ्या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय अथवा तशा इतिवृत्ताला मंजुरी देऊ नये असा पवित्रा घेतला. तसेच तसे लेखी देण्याची मागणी बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, केशवराव जगताप, योगेश जगताप, अनिल तावरे या राष्ट्रवादीच्या संचालकांनी लावून धरली. त्यामुळे रंजन तावरे आणि उपस्थित संचालकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
माळेगाव कारखान्याने साखर आयुक्तांकडून बंदी असताना तब्बल ४५० कामगारांची भरती केली आहे. तसेच कारखान्याच्या कारभारातील अनेक विषयांवर शंका व्यक्त झालेली आहे. असे असताना मागील ३० सभांचं इतिवृत्ताचं नेमकं गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही कारखान्याच्या कार्यकारी संचालकांशी संगनमत करून मागील सभांच्या इतिवृत्तासह महत्वाच्या कागदपत्रांमध्ये गोलमाल करण्याचा रंजन तावरे यांचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या संचालकांनी केला आहे.










