बारामती : महान्यूज लाईव्ह
गेली दहा ते पंधरा वर्षे सामाजिक कामात व्यग्र असणारे व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक राहिलेले डॉ. भगवान माळी व त्यांचे कुटुंबीय आज अगदी थोडक्यात व अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानी तत्परतेमुळे वाचले.
डॉ. भगवान माळी यांचे तांदुळवाडीतील बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष अजय पाटील यांच्या घरापासून काही अंतरावर दोन मजली इमारतीचे बांधकाम चालू असून, त्यापैकी तळमजला तील इंटेरिअरचे काम चालू होते, स्वतः डॉ. माळी व त्यांच्या पत्नी प्राध्यापिका माळी यांच्यासह यांचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर राहण्यास आले होते. आज पहाटे सकाळच्या वेळी मला जाणाऱ्या काही लोकांना या इमारतीच्या खालच्या बाजूकडून धूर व जाळ दिसला.
माळी यांचे कुटुंब दुसर्या मजल्यावर अडकले होते.त्यांना याची कल्पना देऊन नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला संपर्क साधून त्याची माहिती दिली व तातडीने मदतीची मागणी केली. पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर बारामती नगरपरिषदेचे अग्निशमन दल तेथे तातडीने पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवून आगीत अडकलेल्या कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले.
या आगीत जीवित हानी टळली, मात्र इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
बारामती नगर परिषद अग्निशमन दलाचे जवान चालक निवृत्ती जाधव, उमेश लालबिगे, निखिल कागडा, चालक राजेन्द्र मिरगुंडे, प्रदिप लालबिगे, मोहन शिंदे यांनी ही कामगिरी केली. या आगीने मात्र डॉ. माळी यांना फार मोठा धक्का बसला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी आज दिवसभर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

- आम्हाला जोडण्यासाठी











