इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी वाहने लुटनाऱ्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दरोडा घालत सुटलेल्या चोरट्यांनी परिसरात दहशत केली आहे. रविवारी (दि. 8 ) मध्यरात्री साडेबारा वाजता सोनाई दूध संघाचे तीन कर्मचारी ड्युटी संपवून मोटर सायकल वरून घरी जात असताना इंदापूर – अकलूज रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाजवळ 5 चोरट्यांनी या कर्मचाऱ्यांच्या तोंडावर दगडाने मारहाण करून जखमी केले. चोरट्यांनी दरोडा टाकून त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख व पाचशे रुपयाचे घड्याळ घेऊन पोबारा केला.
याबाबत जखमी कर्मचारी उमेश अशोक फासगे वय 19 राहणार वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अज्ञात 5 चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी उमेश फासगे व त्याचे मित्र सुनील सुरेश फासगे व कन्हैया माऊली गायकवाड (रा. वडापुरी, ता. इंदापूर) हे तिघेजण सोनाई दूध संघाची रात्री बारा वाजेपर्यंतची ड्युटी संपल्यावर वडापुरी गावाकडे दुचाकीवरून निघाले असता, इंदापूर अकलूज रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाजवळ आले. तेथे दुचाकी नंबर एम. एच. 45 एम 1783 वरील दोघे तसेच दुसऱ्या नंबर नसलेल्या दुचाकीवरील दोन व रिक्षा मधील एक अशा पाच अनोळखी चोरट्यांनी उमेश फासगे व त्याचे मित्र सुनील फासगे व कन्हैया गायकवाड यांना दगडाने मारहाण केली.
गालावर दगड मारला गेल्याने कर्मचारी जखमी झाले. यातील फिर्यादी उमेश फासगे याच्या हातातील घड्याळ व त्याच्या मित्राच्या पॅन्टच्या खिशातील पाचशे रुपये रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेली आहे अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री जाधव करत आहेत.
या घटनेच्या अगोदर वकीलवस्ती भागातील एका प्रतिष्ठितव्यक्ती वरही दरोडेखोरांनी दगडाने हल्ला केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र त्यांनी आपले वाहन न थांबवता आपला बचाव करत जखमी अवस्थेत निघून गेले. त्यानंतर थोड्याच वेळात हे तीन युवक कर्मचारी त्यांच्या जाळ्यात सापडले असे समजते.
सदरच्या घटनेमुळे रात्रपाळी करून घरी जाणाऱ्या संघाच्या व इतर कंपनीतील कर्मचारी तसेच व्यवसायिक यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी इंदापूर बारामती राज्य रस्त्यावरील तरंगवाडी जवळील वेताळ मंदिराच्या जवळ रात्रीच्या वेळी चोरट्यांकडून गाड्या लुटल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे किंवा ड्युटी वरून घरी जाणे जिकिरीचे झाले आहे. इंदापूर पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.










