इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भिगवण येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडून 24 लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा दीडशे किलो गांजा तसेच चार लाख रुपये किमतीच्या चार चाकीवाहना सह 28 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीत अकोला फाट्या जवळ सदर पथकाने सापळा रचून सदर कारवाई केली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते. पुणे जिल्ह्यात अवैध गांजाची वाहतूक थांबवण्यासाठी सदरील पथकाने काल दि. 6 रोजी मिळालेल्या माहितीवरून भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक टाटा कंपनीच्या सिल्वर रंगाच्या चारचाकी वाहन( क्रमांक एम एच 13 सी एस 16 26) या कार मध्ये अवैधरित्या गांजा सोलापूर- पुणे मार्गावरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार भादलवाडी हद्दीत सोलापूर – पुणे महामार्गावर भिगवण पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अकोला फाट्या जवळ सदर पथकाने सापळा रचून सदर वर्णनाची गाडी दुपारी दिसताच ती ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली. कारचालक सचिन कुमार मिरगणे (वय 32 वर्षे, रा. सुभाष नगर 14 नंबर शाळे पाठीमागे बार्शी ता. बार्शी ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीची पाहणी केली असता मागील सीट वर 3 खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या मिळून आल्या. तसेच सदरील गाडीच्या डिकी मध्ये खाकी रंगाच्या 2 मोठ्या गोण्या मिळून आल्या. सदरील गोण्या उघडून पाहिल्या असता त्यामध्ये गांजा नावाचा अंमली पदार्थ मिळून आल्याचे पोलीसांनी सांगितले.
सदरच्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे : 5 लाख 20 हजार रुपये (अंदाजे 15 हजार रुपये किलो या प्रमाणे किंमतीचे खाकी गोणीत 16 पाकिटे त्याचे गोणीसह वजन 34 किलो 700 ग्रॅम ) 5 लाख 10 हजार रुपये( एका खाकी गोणीत 15 हजार रु. किलो प्रमाणे 16 पाकिटे त्याचे गोणीसह वजन 34 किलो) 5 लाख 25 हजार रुपये (एका खाकी गोणीत 15 हजार रु. किलो प्रमाणे 16 पाकिटे त्याचे गोणीसह वजन 35 किलो कि.रु.अंदाजे) 5 लाख 22 हजार रुपये (एका खाकी गोणीत 15 हजार रुपये किलो प्रमाणे 16 पाकिटे त्याचे गोणीसह वजन 34 किलो 800 ग्रॅम कि.रु. अंदाजे) तीन लाख 33 हजार रुपये( एका खाकी गोणीत 15 हजार रु किलो प्रमाणे 11 पाकिटे त्याचे गोणीसह वजन 22 किलो 200 ग्रॅम कीं.रु.अंदाजे) चार लाख रुपये (एक सिल्वर रंगाची टाटा कंपनीची झिस्ट कार क्र.एम.एच. 13 सी. एस. 16 26 जुनी वापरती कीं.रु.अंदाजे) असा एकूण 28 लाख 10 हजार 500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींवर गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1958 चे कलम 8 (क),20 (क)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुद्देमाल सह पुढील तपास कामी भिगवण पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.
या आरोपींवर सुर्यपीठ राज्य तेलंगणा येथे 2013 साली गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1958 चे कलम 8( क ),20 (क)नुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच फौजदार शिवाजी ननवरे, हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, अभिजित एकशिंगे, विजय कांचन, धीरज जाधव तसेच भिगवण पोलीस स्टेशनचे आर.आर. पठाण, ए. एम.माने यांनी केली.
पुढील तपास भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक रियाज शेख करित आहेत.











