दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरातील चौकाचौकांत कचऱ्याचा ढिग साचला आहे. केरकचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या ही कचऱ्यांनी भरल्या आहेत. ठिकठिकाणी असणा-या अस्वच्छतेमुळे शहरवासियांचा श्वास गुदमुरतो आहे. या प्रकाराकडे मात्र नगरपालीका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे
सोईस्करपणे दुर्लक्ष होत आहे.
मागील काही महिन्यापासून कोरोना सारख्या संसर्गजन्य महामारीमुळे दौंडकरांवर मोठे संकट आले
होते. शहरातील गल्ली बोळात कोरोना प्रादुर्भाव वाढला होता. कुटूंबे कोरोनाबाधित आढळत होती. माजी नगराध्यक्षसह काही नगरसेवकांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या कोरोनाच्या संकटातून
शहरवासीय आता कुठे सावरत नाही तोच शहरातील चौकाचौकातील कचराच्या घाणीच्या साम्राज्यामुळे पुन्हा एकदा नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दौंड – गोपाळवाडी रोडवर भाजी मार्केटमध्ये रस्त्यावर कचरा व मोठा ढिग साचले आहेत. तशीच परिस्थिती दौंड मधील प्रत्येक चौकाचौकात व गल्लीबोळात आहे, नगरपालिका प्रशासन कचराकुंड्यामधील हा केरकचरा वेळेत साफसफाई करीत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
ठिकठिकाणी साचलेल्या या केरकचरा व घाणीमुळे दुर्गंधी पसरली आहे. डासांची उत्पत्ती वाढली असून नव्याने रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यातच मोकाट जनावरांचा त्रास यात भर घालत आहे. नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी साचलेला कचरा काढून साफसफाई करावी, कचराकुंड्याची स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











