राज्यमंत्र्यांची शंभराची पावती…माजी मंत्रीपुत्रांची पाचशेची…!
इंदापूर – महान्यूज लाईव्ह
काल इंदापूर तालुक्यात लासुर्णे येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विनामास्क फिरल्याबदद्ल ग्रामपंचायतीने दंड केलेली १०० रुपयांची पावती फाडली. त्यानंतर आज माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र व निरा-भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायतीने केलेला ५०० रुपयांचा दंड भरला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या शह काटशहाचे राजकारण आता दंडापर्यंत येऊन पोचल्याने तालुक्यातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. १०० रुपयांना ५०० रुपयांचे उत्तर अशी घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी लागलीच सोशल मिड़ियावर केली.
लासुर्णे येथे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दोन दिवसांपूर्वीच १०० रुपये दंड भरला होता. त्यावरून भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार यांनी राज्यमंत्र्यांना १०० रुपये दंड व इतरांना ५०० रुपये का? असा प्रश्न केला होता. त्यानंतर आज बावड्यात ५०० रुपयांचा दंड भरून राजवर्धन पाटील यांनी या दंडाच्या लढाईला तोंड फोडले. १०० रुपयांना ५०० रुपयांचे उत्तर योगायोगाने दिले की, ठरवून याची मात्र माहिती मिळू शकली नाही.











