बारामती – माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत सभासदांनी अत्यंत चाणाक्षपणे उमेदवार निवडले, मात्र तरीदेखील राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेललाच यावेळी मतदारांची पसंती असून जाहीर झालेल्या १६ जागांमध्ये निळकंठेश्वरने ११ जागांवर बाजी मारली आहे, ५ जागा या सत्ताधारी पॅनेलला मिळाल्या असून यावेळी माळेगावमध्ये परिवर्तनाची चिन्हे आहेत. उर्वरित पाचही जागांवर सध्या तरी निळकंठेश्वरचे उमेदवार आघाडीवर आहेत.
वादामुळे सोमवारी दुपारी सुरू झालेली मतमोजणी अत्यंत धीम्या गतीने सुरू असून आतापर्यंत पहाटे हाती आलेल्या माहितीनुसार १६ जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर अथवा भाजपच्या सहकार बचाव या दोन्ही पॅनेलमधील महत्वाचे सर्व उमेदवार यामध्ये विजयी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाले असून मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे यातून दिसत आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीत काय होणार याची राज्यभरात उत्सुकता आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत मतमोजणीही सुरू न झाल्याने याची उत्कंठा वाढतच गेली. पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार प्रवर्गात राष्ट्रवादीचे स्वप्नील शिवाजी जगताप यांनी बाजी मारली. मात्र हा निकाल अपेक्षितच होता. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सहकारावर वर्चस्व असल्याने या प्रवर्गात राष्ट्रवादी विजयी होणार हे निश्चित होते. त्यानंतर पहिल्या गटात माळेगावचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनेलमधून एकट्यानेच विजय मिळवला व या गटात राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील तावरे व संजय काटे हे विजयी झाले.
आतापर्यंत मतमोजणी झालेल्या जागांपैकी विजयी उमेदवार
गट क्रमांक १ -माळेगांव) – बाळासाहेब तावरे- राष्ट्रवादी, संजय काटे- राष्ट्रवादी, रंजनकुमार तावरे- सहकार बचाव
गट क्रमांक २- पणदरे) – केशवराव जगताप- राष्ट्रवादी, तानाजी कोकरे- राष्ट्रवादी, योगेश जगताप- राष्ट्रवादी
गट क्रमांक ३ – सांगवी – चंद्रराव तावरे- सहकार बचाव, सुरेश खलाटे- राष्ट्रवादी, रणजित खलाटे- सहकार बचाव
गट क्रमांक ४ निरावागज- मदनराव देवकाते- राष्ट्रवादी, बन्सीलाल आटोळे- राष्ट्रवादी, प्रताप आटोळे- सहकार बचाव
गट क्रमांक ५ – बारामती – नितीन सातव -राष्ट्रवादी, राजेंद्र ढवाण – राष्ट्रवादी, गुलाबराव गावडे- सहकार बचाव











