महान्यूज : आजची गझल
लावतो हुरहुर जिवाला सांजवारा सारखा
खुणवतो तिमिरातुनी मज,एक तारा सारखा
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
पारदर्शी धोरणांचा बोजवारा सारखा..
अंतरी आकांत करतो,सातबारा सारखा…
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
हारण्यासाठी जगाच्या, शर्यतीचा भाग मी…
मग उगा का व्देष करतो हारणारा सारखा…
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
मी स्मृतिंच्या पुस्तकांना, वाचण्याचे टाळतो..
पोळतो मज आठवांचा हा निखारा सारखा..
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
ते जुने सोडून बाळा तू नवे घर बांधले..
या नव्या घरट्यात होतो, कोंडमारा सारखा…
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
मी सरावानेच पाणी, मिसळतो दु:खातही..
तू नको देवू सुखाचा मज उतारा सारखा..
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
हे कसे संचीत माझे,सोडले की सांडते…
जीवनाचा ठेवतो पकडून पारा सारखा
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
झोपड्यांच्या वेदनांची शोधण्याला कारणे…
मारतो मी बंगल्यांना, येरझारा सारखा…
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
ती म्हणाली नेहमी तुज हासतांना पाहुदे..
मी नितिन कोठून आणू ,हासणारा सारखा..
•••••••••••••••◆◆◆◆◆◆•••••••••••••••••••
गझलकार- नितीन देशमुख, चांदूरबाजार
सौजन्य : गझलपुष समूह पिंपरी-चिंचवड

अप्रतिम गझल