बारामती : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील कराड येथील व्यापार्याचा परवाना रद्द केल्यानंतर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाशिकमध्ये व्यापाऱ्यांना दणका दिला.
नाशिकमध्ये मक्याची व सोयाबीनची खरेदी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने होत होती.सरकारने जाहीर केलेला मक्याचा किमान आधारभूत किमती चादर हा प्रतिक्विंटल 1850 रुपये,तर सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर हा 3880 रुपये एवढा आहे, मात्र प्रत्यक्षात नाशिक बाजार समितीमध्ये मक्याची खरेदी 850 रुपये ते 1350 रुपये अशा कमी किमतीने होत होती, त्यामुळे येथील सर्व शेतकरी संतप्त झाले होते.
हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने दिलासा दिला. शेतकऱ्यांनी कराड येथील व्यापार्यांचा परवाना रद्द झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते यांच्याशी संपर्क साधला व नाशिकमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर बाजार समिती अधिनियम व पणन खात्याच्या पणन कायद्याचे कलम 34 व 94 (ड) यांचा आधार घेत संबंधित व्यापार यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे केली. यासाठी स्वतः रघुनाथदादा पाटील यांनी नाशिक घातले होते रघुनाथदादा पाटील यांनी ही परिस्थिती नाशिक धुळे जळगाव सह उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे असल्याची जिल्हा उपनिबंधक यांच्या निदर्शनास आणून दिली.याकरिता शेतकरी संघटनेने तेथील झालेले लिलाव आणि तेथील पावत्या देखील जिल्हा उपनिबंधकांना दाखवल्या ही बाब जिल्हा उपनिबंधकांनी गांभीर्याने घेऊन तातडीने निर्देश दिले
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना व बाजार समित्यांच्या सचिवांना यामध्ये निर्देशित करण्यात आले की, किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी होत आहे असे निदर्शनास आले असून जर यापुढे किमान आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी झाला तर अशा व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत व ज्यांनी आत्तापर्यंत किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केलेला आहे, अशा सर्व व्यापाऱ्यांनी या लिलावातील फरकाचा रकमा संबंधित शेतकऱ्यांना तातडीने देण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.
यावेळी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, कराड तालुकाध्यक्ष विनायक जाधव, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, पश्चिम महाराष्ट्र संघटक हनुमंत वीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.











