बारामती : महान्यूज लाईव्ह
अजितदादांनी आज बारामती, इंदापूर तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी इंदापूर तालुक्यातील ओढ्यावरील अतिक्रमणामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना ओढ्याकाठची अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश दिले. अगदी अजित पवारचे अतिक्रमण असले तरी मुलाहिजा बाळगू नका असा आदेशच त्यांनी दिल्याने आता ही अतिक्रमणे निघतील व ओढे रुंद होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
बुधवारच्या वादळी पावसाने इंदापूर व बारामती तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. आज बारामती, इंदापूरसह सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पवार सकाळी सात वाजताच बाहेर पडले. त्यांनी आज सकाळी सात वाजताच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी भिगवण रस्त्यासह तांदुळवाडी, चांदगुडे वस्ती, खंडोबानगर, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, पाहुणेवाडी, गुणवडी परिसराची पाहणी केली. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील सणसर, जंक्शन, निमगाव केतकी येथे पाहणी करून त्यांनी उजनी धरण परिसरात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.
इंदापूर तालुक्यात सणसर येथे पाहणी करताना त्यांनी जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धो़डपकर यांना बोलावून पहिल्यांदा ओढ्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करा, कोणाही धनदांडग्याचे अतिक्रमण असो, लागलीच काढा, अगदी अजित पवारचे जरी असले तरी मुलाहिजा बाळगू नका असे निर्देश देत त्यांनी ही कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश दिले. पवार यांच्या या दौऱ्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता राजेंंद्र धोडपकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामतीचे गटनेते सचिन सातव याच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी या भेटीदरम्यान सहभागी झाले होते.











