इंदापूर : महान्यूज लाईव्ह
https://m.facebook.com/story.php?story_fbid=205893264286814&id=111857893690352
ओढ्याला पूर आला तरीदेखील घरापर्यंत कधी येत नाही, गेल्या पंधरा-वीस वर्षांत कधी आलाच नाही..म्हणून सणसर येथील शिर्के मळ्यात परवा पावसानंतरही काही हालचाल नव्हती.. पण अचानकच पूराने घराला वेढा दिलेला कळला आणि सुवर्मा शिर्के यांचे कुटुंबीय हडबडून गेले.. काय करावे काहीच कळेना, अगदी पंधरा मिनिटांच्या आत पाणी अत्यंत वेगाने गळ्यापर्यंत येऊन पोचले आणि मग मात्र कशाचीच फिकीर न करता शिर्के कुटुंबीय घराच्या स्लॅब वर चढून बसले.. जीव तर वाचला, पण अचानक लक्षात आले की, या पाण्यात आपली जनावरे अडकली आहेत आणि त्यापेक्षाही गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून ज्यांच्या जीवावर सगळा प्रपंच चालतो, ते दावणीचे बैल अडकले आहेत असे समजल्यावर सुवर्मा यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ती धाय मोकलून रडू लागले..
चक्रीवादळाच्या पावसाने संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, ते नुकसान शेतकऱ्यांच्या आज पर्यंत खोल गेलेले आहे. या नुकसानाचे एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे सणसर मधील शिर्के मळ्यातील सुवर्णा शिर्के यांची कहाणी.. हा महापूर शिर्के कुटुंबियांसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा असाच संकटाचा प्रसंग आहे, कारण या संकटाने त्यांच्या उदरनिर्वाहाची साखळी तोडली..
पावसाचे पाणी पाच तासानंतर ओसरले तेव्हा दावणीच्या खुंट्या तोडण्यासाठी हात-पाय झाडलेले बैल, खुंट्या निघाल्या परंतु तत्पूर्वीच जीव गेल्याने वाहून गेले. हे बैल आणि चुलत्यांची एक गाय गोठ्यापासून काही अंतरावर एका झाडाला अडकली. अडकलेले बैल पाहून सुवर्मा यांचा बांध फुटला आणि ते धाय मोकलून रडू लागले.
या दावणीच्या दौलतीची आणि सुवर्मा शिर्के यांच्या उदरनिर्वाहाची कहाणी तशी नात्याने घट्ट बांधलेली.. पंधरा सोळा वर्षांपूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्यात अगदी एक रुपयावर काम करतो असे म्हणून स्पर्धेच्या परिस्थितीत अत्यंत कमी पैशात म्हणजे दिवसाला 50 रुपये रोजगार या तत्वावर सुवर्मा शिर्के यांनी आपली बैलगाडी कारखान्याच्या कामासाठी वर्षभर कराराने दिली.. तेव्हापासून गेली पंधरा -सोळा वर्षे सुवर्मा शिर्के हे या कारखान्यात कंत्राटी तत्वावर बैलगाडी चालवतात.
ही बैलगाडी चालवणारे बैल म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहाची नाडीच आहे. परवा अचानक आलेल्या पावसात आणि त्यानंतरच्या महाप्रचंड पुरात हे बैल वाहून गेले. आता हे बैल कोठून मिळणार आणि बैलांसाठी पैसा कोठून आलो असा प्रश्न शिर्के कुटुंबियांना पडला आहे.
आता सरकारी पंचनामे होतील. पंचनाम्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आकडा सुद्धा समाविष्ट असेल, पण तो आकडा त्यांना मिळणार आहे का? निश्चितच नाही..कारण, सरकार कोणतेही असले तरी झालेले नुकसान भरुन येत नाही. याहीपेक्षा मालकाला जीव लावलेले आणि आजवर कुटुंबीयांच्या जीवासाठी श्रमणारे बैल जीवानिशी गेल्याचे दुःख मात्र शिर्के कुटुंबाच्या काळजात कायमच कोरलेलं राहील…











