महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सरकारने दोन लाख आरटीपीसीआर तपासणी किट सदोष असल्याच्या कारणाने शासकीय प्रयोगशाळांना दिलेली किट माघारी बोलावली आहेत, कारण यात किट मधून झालेल्या तपासण्या निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले होते.
अर्थात आत्तापर्यंत यातील 25 हजार चाचण्या झालेल्या आहेत. दुसरीकडे राज्यभरात रुग्ण निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे, तो त्याचा परिणाम नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. अर्थात तसे नसेल तर ठिक, पण असेल तर येणाऱ्या काळात कोरोनाची फार मोठी लाट येणार याची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जात आहे.
यासंदर्भात देशातील आघाडीच्या वृत्तपत्राने तसेच टाइम्स समूहाने देखील याची दखल घेत वस्तुस्थिती मांडली आहे. सरकारने साडेबारा लाख तिकीट खरेदी केली होती, त्यापैकी राज्य सरकारच्या वाट्याला 6.29 लाख किट आली होती, त्यातील दोन लाख किट राज्य सरकारने 58 जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय प्रयोग शाळांसाठी पोहोचवली होती.
यापैकी 25 हजार किटचा आतापर्यंत वापर झाला, मात्र यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण देखील निगेटिव्ह येऊ लागले, त्याचप्रमाणे खाजगी प्रयोगशाळांमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण शासकीय आरटीपीसीआर मध्ये निगेटिव्ह येण्याचे प्रमाण दिसू लागले, त्यामुळे शासकीय प्रयोगशाळांमध्ये त्याची चर्चा झाली आणि त्यामुळे राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत दिलेली किट माघारी बोलावली आहेत.
अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे, तो याचा परिणाम नसेल तर चांगलेच आहे.परंतु जर सदोष किटमुळे रुग्ण निगेटिव्ह घेण्याचे प्रमाण वाढले असेल, तर मात्र चिंता करण्याची गरज आहे.











