मुंबई : महान्यूज लाईव्ह
भाजपामध्ये नाराज असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या शनिवारी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे हे आपल्या हाती घड्याळ घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काल माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारत खडसे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी दाखवून दिली आहे.
मागील आठवड्यात एकनाथ खडसे यांनी मुंबई दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्या कार्यपद्धतीवर उघड टीका केली. त्यातच त्यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चाही अनेक दिवसांपासून झडत आहेत.
मुंबईत शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी आपला पक्ष प्रवेशाचा निर्णय निश्चित केल्याचे समजते. त्यासाठी त्यांनी घटस्थापनेदिवशीचा अर्थात १७ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडला असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या समर्थकांकडूनही राष्ट्रवादी पुन्हा या आशयाचा पोस्ट सोशल मिडियात टाकल्या जात असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.











