जागेच्या वादातून कामगार हामजा शेख यांचा घेतला जीव
शिरूर : महान्यूज लाईव्ह
रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांचा डोक्यात गोळी झाडून खून करण्यात आल्याच्या घटनेचा रांजणगाव पोलिसांनी छडा लावला आहे. जागेच्या वादातून विकास नवले यांचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कारेगाव येथील साईनगर परिसरात विकास नवले यांच्या खोलीत भाड्याने राहणारे हामजा उस्मान शेख हे पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करीत होते. ते कामावर गेले असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला होता. फिर्याद दाखल केल्यानंतर रांजणगाव पोलिसांनी तपास सुरू केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने घटनास्थळ तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा माग काढण्यात आला.
या तपासादरम्यान सार्थक संदेश कोहकडे, तुषार अजय तोडकर, संतोष मधुकर मांजरे, विठ्ठल नवनाथ पिकळे आणि योगेश विलास इडोळे यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत सार्थक कोहकडे याचा त्याच्या घराशेजारी राहणारे विकास नवले यांच्यासोबत जागेवरून वाद असल्याचे समोर आले.
याच वादातून सार्थक संदेश कोहकडे याने विकास नवले यांचा खून करण्यासाठी तुषार अजय तोडकर याला सुपारी दिली.
त्यानंतर तुषार तोडकर याने संतोष मधुकर मांजरे याला विकास नवले यांचा खून करण्याची सुपारी दिली. संतोष मांजरे याने त्याचे साथीदार पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव, विठ्ठल नवनाथ पिकळे आणि योगेश विलास इडोळे यांच्यासोबत संगनमत करून विकास नवले यांच्या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये खून करण्याचा कट रचला.
मात्र, आरोपींनी विकास नवले हेच असल्याचे समजून त्यांच्या कामगार हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. या हल्ल्यात हामजा शेख यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांनी या हत्येच्या कटाचा उलगडा करून पाच आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव यांचा शोध सुरू आहे.
हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, रांजणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार महेश डोंगरे, रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक तिडके, पोलिस उपनिरीक्षक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शरद बांबळे, संजय पड्याळ, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव,विकास पाटील, सागर धुमाळ, संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे,संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विलास आंबेकर, उमेश कुतवळ, योगेश गुंड,रासकर, संतोष साळुंके, दत्तात्रय शिंदे आणि खेड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संकेत कवडे यांनी ही कारवाई केली.










